Join us

बेकायदा इमारतींचे पेव

By admin | Updated: August 7, 2014 00:52 IST

तालुक्यात बेकायदा इमारतींचे पेव फुटले आहे. अशा गृहप्रकल्पातील घरे स्वस्त असल्याने अनेक ग्राहक विकासकांच्या भूलथापांना बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेत आहेत.

पनवेल : तालुक्यात  बेकायदा इमारतींचे पेव फुटले आहे. अशा गृहप्रकल्पातील घरे स्वस्त असल्याने अनेक ग्राहक विकासकांच्या भूलथापांना बळी पडून स्वत:ची फसवणूक करून घेत आहेत. 
 सिडकोने  कळंबोली, नवीन पनवेल, कामोठा , खारघर त्याचबरोबर उलवे, तळोजा पाचनंद, करंजाडे  हे नोड विकसीत केले. या ठिकाणी भूखंड शिल्लक राहिले नसल्याने आता पनवेल तालुक्यातील आजूबाजूच्या गावात गृह प्रकल्प उभारण्यात येत आहेत. नेरे, वारदोली, तुराडे, कसळखंड, पाली देवद, चिंध्रन, हरीग्राम, वाजे, चिखले, कोप्रोली या ठिकाणी सध्या मोठय़ाप्रमाणात बांधकामे सुरू आहेत. यापैकी अनेक बांधकामांना नगररचना विभागाचा परवाना तसेच बिनशेती परवाना नसल्याचे आढळून आले आहे. केवळ ग्रामपंचायतीच्या परवानगीने ही बांधकामे उभारली जात असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत केवळ घर बांधणीसाठी परवानगी देते. मात्र या परवानगीच्या आडून अनेकांनी टोलेजंग इमारती उभारण्याचा सपाटा चालविला आहे. अशा इमारतीतील घरे स्वस्त दरात विकून विकासक परागंदा होत असल्याचे दिसून आले आहे. 
प्रस्तावित नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल तालुक्यातील विमानतळ प्रभावित क्षेत्रच्या ( नयना) नियोजनाची जबाबदारी शासनाने सिडकोवर टाकली आहे.  त्यामुळे बांधकामासाठी आता सिडकोचीही परवानगी क्रमप्राप्त झाली आहे. यासंदर्भातील नियोजन आराखडा अद्याप तयार नसल्याने कोणत्याही बांधकामांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे बिगरशेती परवानग्याही दिल्या जात नाहीत. असे असताना परवानग्यासाठी केलेल्या अर्जाच्या केवळ पोच पावत्यांच्या आधारे विकासकांनी या परिसरात बांधकामांचा धडाका लावल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी अद्याप कामेही सुरू नाहीत. तरीही अनेकांनी कार्यालये थाटून घरांसाठी बुकिंग घ्यायला सुरूवात केली आहे. या प्रकारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर)
 
विमानतळाच्या नावाने बिल्डर मालेमाल 
पनवेल तालुक्यातील आजूबाजूच्या गावामध्ये उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पांची मोठया प्रमाणात जाहिरात बाजी केली जाते. त्यामध्ये विमानतळ, रेल्वस्थानक, द्रुतगती महामार्ग हाकेच्या अंतरावर असल्याचे सांगितले जाते. मात्र  स्वस्तात घर मिळतय तर घेऊन टाकू असा विचार करीत ग्राहक बिनशेती परवाना, नैनाची परवानगी याबाबत पडताळणी करत नसल्याने बिल्डरांची चलती आहे. ग्राहकांना पटविण्यासाठी बोलबच्चन मुले मुली ठेवण्यात आली असून ते सर्वसामान्यांवर मोहिनी टाकत आहेत. 
 
82 बांधकांना नोटिसा 
पनवेल तालुक्यात अनेक बांधकामे बेकायदा असून त्यांना बिनशेती परवानगी नाही. त्याचबरोबर आता नैनाची परवानगीही आवश्यक असल्याने त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळत नाही तोर्पयत बांधकाम करता येत नाही. असे असतानाही काही बिल्डर ग्राहकांना भुलथापा देऊन  त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत त्यांच्यापासून सावध राहणो गरजेचे असल्याचे आवाहन तहसिलदार पवन चांडक यांनी केले आहे.  आम्ही अशा 82 बेकायदा बांधकामाना नोटीसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर याबाबत सिडकोलाही कळविले असल्याचेही त्यांनी सांगितले