Join us  

राजीव गांधी जीवनदायी योजनेविषयी रुग्णाला अंधारात ठेवणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 1:43 AM

चेंबूरमधील रुग्णालय : बिलाची रक्कम परत करण्याचा ग्राहक मंचाचा आदेश

मुंबई : राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी पात्र असताही या योजनेची माहिती न दिल्याने रुग्णाला सुमारे सव्वादोन लाख रुपये बिलापोटी भरावे लागले. ही रक्कम नातेवाइकांकडून उसनी घ्यावी लागली. चेंबूरच्या सुराणा सेठिया हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तसेच राजीव गांधी जीवनदायी योजना सोसायटीने रुग्णाला याबाबत माहिती देण्यात काहीही स्वारस्य न दाखविल्याने व सेवेत कसूर केल्याबद्दल अतिरिक्त मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, वांद्रे यांनी रुग्णाला बिलाची संपूर्ण रक्कम परत करण्याचे आदेश दिले.

चेंबूरचे रहिवासी विनोद प्रभू यांच्या छातीत दुखू लागल्याने ते सुराणा सेठिया हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरांनी त्यांची तत्काळ अँजिओप्लास्टी केली. त्यांनंतर रुग्णालय सोडताना त्यांना २ लाख २५ हजार २३२ रुपयांचे बिल देण्यात आले. दरम्यान, प्रभू यांना रुग्णालयातून सोडण्यापूर्वी एक दिवस आधी राजीव गांधी जीवनदायी योजनेची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी रुग्णालयाच्या आरोग्यमित्राकडे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा केली. मात्र, त्यापुढे काहीही पावले न उचलल्याने प्रभू यांना बिलाची रक्कम भरण्यासाठी नातेवाइकांकडून आर्थिक मदतघ्यावी लागली. रुग्णालयातून सोडल्यानंतरही प्रभू यांनी योजनेअंतर्गत पैसे मिळावे, यासाठी रुग्णालयाच्या आरोग्यमित्राकडे वारंवार खेटे घातले. अखेरीस त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे प्रभू यांनी ग्राहक मंचात तक्रार केली. अ‍ॅड. प्रशांत नायक यांनी प्रभू यांची ग्राहक मंचापुढे बाजू मांडली. सुराणा सेठिया हॉस्पीटल व रिसर्च सेंटर तसेच राजीव गांधी जीवनदायी योजना सोसायटीने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. मात्र ग्राहक मंचाने तक्रारदाराची तक्रार ग्राह्य धरली. रुग्णालयाने उपचारार्थ घेतलेली २ लाख २५ हजार २३२ रुपये इतकी रक्कम ३० दिवसांत परत करावी, असा आदेश ग्राहक मंचाने दिला. तर तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी ३० हजार रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रुपये संयुक्तिकपणे देण्याचा आदेश रुग्णालय व राजीव गांधी जीवनदायी योजना सोसायटीला ग्राहक मंचाने दिला.रुग्णालयाच्या सेवेत त्रुटी; ग्राहक मंचाचे निरीक्षण !राजीव गांधी योजनेची माहिती तक्रारदार किंवा त्यांच्या नातेवाइकांना नव्हती तरी त्याबाबतची माहिती रुग्णालय व आरोग्यमित्राने द्यायला हवी होती. योजनेची माहिती न दिल्याने तक्रारदाराला अनावश्यक त्रास झाला. त्यांना नातेवाइकांकडून रक्कम उसनी घ्यावी लागली. तक्रारदाराला या योजनेची माहिती उपचारापूर्वी किंवा उपचारादरम्यान देण्यात आली असती तर उपचारासाठी आलेला खर्च राजीव गांधी जीवनदायी योजनेद्वारे भरला गेला असता. मात्र, रुग्णालयाने व आरोग्यमित्राने यात स्वारस्य दाखवले नाही. रुग्णालयाच्या सेवेत त्रुटी आहेत, असे निरीक्षण ग्राहक मंचाने नोंदविले. 

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल