Join us

ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना पाणीच नाही

By admin | Updated: December 14, 2014 23:35 IST

मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील समस्या एकापाठोपाठ एक वाढतच चालल्या असून येथील रुग्णांना प्यायला पाणीदेखील मिळत नसल्याने रुग्णांना चक्क २० रुपयांचे बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ आदिवासी रुग्णांवर आली.

मोखाडा ग्रामीण : मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील समस्या एकापाठोपाठ एक वाढतच चालल्या असून येथील रुग्णांना प्यायला पाणीदेखील मिळत नसल्याने रुग्णांना चक्क २० रुपयांचे बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ आदिवासी रुग्णांवर आली आहे.मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पाण्याचा पुरवठा खाजगी वाहनाद्वारे केला जात असून वर्षभराचे बिल थकल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांनी सांगितले. यामुळे उपचारासाठी येणाऱ्या आदिवासींचे अतोनात हाल होत आहेत. आदिवासी विकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अशी परिस्थिती असूनही त्यांचे त्याकडे लक्ष नसल्याने खेद व्यक्त होत आहे. वास्तविक, आदिवासी विकासमंत्र्यांनी येथील समस्या सोडवायला हव्यात, अशी मागणी होत आहे. तालुक्याची लोकसंख्या लाखावर जाऊन ठेपली आहे व येथे दारिद्रयरेषेखालील कुटुंबांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे आदिवासी बांधवांच्या खिशाला पैशांची नेहमीच चणचण भासते. यामुळे खेड्यापाड्यांतून येणारा आदिवासी बांधव कसाबसा गाडीभाडे करून मोफत उपचार म्हणून ग्रामीण रुग्णालयात धाव घेतो. परंतु, या ठिकाणी रुग्णांना कोणत्याच सुविधा मिळत नसून काही दिवसांपासून रुग्णांना पाणी मिळत नसल्याने बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. याशिवाय, या ग्रामीण रुग्णालयात सुविधांची वानवा आहे. अनेक रिक्त पदे, खाटांची कमतरता, मनमानी कारभार तसेच आदिवासी रुग्णांना कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने उपचाराविना परवड होत आहे. (वार्ताहर)