Join us
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट कार्यालये आणखी १५ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय मुंबई अंतर्गत येणारी सर्व पासपोर्ट सेवा केंद्रे आणखी १५ दिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय मुंबई अंतर्गत येणारी सर्व पासपोर्ट सेवा केंद्रे आणखी १५ दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आरपीओच्या अखत्यारित येणारी सर्व पासपोर्ट सेवा केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सर्व्हिस सेंटर येत्या १५ जूनपर्यंत बंद ठेवण्यात येतील. अर्जदारांनी त्यानुसार नोंदणी करावी.

एप्रिलमध्ये राज्यात कठोर निर्बंध लागू केल्यानंतर मुंबई प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने आपली सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन वाढत गेले, तसतशी ही स्थगिती वाढविण्यात आली. २८ मे रोजी मुदत संपुष्टात येऊन सोमवार ३१ मेपासून सेवा सुरू करणार असल्याचे पासपोर्ट कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे अर्जदारांनी तारीख आरक्षित केली. परंतु, राज्यातील लॉकडाऊन वाढविल्याने पासपोर्ट सेवा केंद्रे १५ जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय मुंबई अंतर्गत येणारी औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, जळगाव, रायगड, धुळे आणि नंदुरबारमधील पासपोर्ट सेवा केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सर्व्हिस सेंटर बंद राहणार आहेत. दरम्यान, आपत्कालीन स्थितीत पासपोर्ट मिळवण्यासाठी आरपीओ मुंबई कार्यालयाशी ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-----------------------------