Join us  

‘जेट’ बंंद झाल्याचा फटका प्रवाशांंना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 6:05 AM

देशाच्या हवाई क्षेत्राची वाढ होत असल्याची चर्चा असताना अशा प्रकारे प्रमुख कंपनी बंद होणे, देशासाठी व हवाई वाहतूक क्षेत्रासाठी धक्कादायक आहे, असे मत एअर पॅसेंजर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर रेड्डी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- खलील गिरकर जेट एअरवेजची उड्डाणे रद्द करून कंपनी बंद करावी लागली. या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. देशाच्या हवाई क्षेत्राची वाढ होत असल्याची चर्चा असताना अशा प्रकारे प्रमुख कंपनी बंद होणे, देशासाठी व हवाई वाहतूक क्षेत्रासाठी धक्कादायक आहे, असे मत एअर पॅसेंजर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर रेड्डी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.प्रश्न : जेट एअरवेजच्या आजच्या स्थितीचा फटका हवाई प्रवाशांना कसा बसला आहे?उत्तर : जेट एअरवेजचा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासात मोठा हिस्सा होता. देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर जेट एअरवेजची सेवा सुरू होती. त्यामुळे जेट एअरवेज बंद झाल्याचा मोठा फटका हवाईमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसू लागला आहे. मोठी हवाई कंपनी अचानक बंद पडल्याने हवाई प्रवासाच्या तिकीट दरात मोठी वाढ झाली आहे. प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सहजरीत्या तिकिटे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्याचा लाभ इतर हवाई वाहतूक कंपन्यांनी घेण्यास प्रारंभ केला आहे.प्रश्न : जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाल्याचा लाभ घेऊन त्वरित विमानाची तिकिटे प्रचंड प्रमाणात वाढवण्याची इतर कंपन्यांची कृती कितपत योग्य आहे?उत्तर : जेट एअरवेज बंद पडल्याने इतर कंपन्यांना त्याचा थेट लाभ झाला आहे. हे क्षेत्र खुल्या बाजारातील असल्याने संबंधित कंपनीच्या दृष्टीने त्यांनी केलेली दरवाढ समर्थनीय आहे. मात्र, प्रवाशांच्या दृष्टीने ती अन्यायकारक व चुकीची आहे. कंपनीने दरवाढ करताना थोडा तरी विचार करण्याची व प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे. देशातील हवाई वाहतूक क्षेत्राचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, अशा वेळी प्रवाशांना हवाई प्रवासासाठी मोठा आर्थिक भुर्दंड पडणे हे या क्षेत्राच्या वाढीसाठी फारसे चांगले चिन्ह नाही. याची दखल हवाई वाहतूक कंपन्यांनी घेणे आवश्यक आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू अशा वर्दळीच्या मार्गावरील विमान उड्डाणांत वाढ करण्याची गरज आहे.तिकीट काढताना प्रवाशांनी कोणती काळजी घ्यावी?उत्तर : जेट एअरवेज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कंपनीवर ही परिस्थिती ओढवली आहे. मात्र त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये ‘जेट’बाबत नाराजी आहे. हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये तिकीट काढताना जितके दिवस अगोदर तिकीट काढू तितका कमी दर असतो व जेवढ्या उशिरा तिकीट काढले जाते तेवढा दर जास्त असतो हा नियम आहे. त्यामुळे जास्तीतजास्त अगोदर तिकीट काढणे हाच पर्याय उरला आहे.केंद्र सरकार, हवाई वाहतूक मंत्रालय, डीजीसीए यासाठी कारणीभूत आहे का?उत्तर : जेट एअरवेज ही खासगी कंपनी असल्याने ही त्या कंपनीची जबाबदारी आहे. सरकार, डीजीसीए, हवाई वाहतूक मंत्रालय यांना यामध्ये फारसे काही करण्यासारखे आहे, असे वाटत नाही. ही घटना एका रात्रीत घडलेली नाही. हा अत्यंत अवघड व काळजीपूर्वक करण्याचा व्यवसाय आहे. थोडीशीही बेफिकिरी केल्यावर काय होते याचे हे उदाहरण आहे. जेटच्या बंद झालेल्या मार्गावर सरकारने त्वरित उड्डाणे वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :जेट एअरवेज