सावंतवाडी : बहुचर्चित सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकरच सुरू होणार असून हे ‘पॅसेंजर’ टर्मिनस असेल. रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण लवकरच करण्यात येईल आणि सावंतवाडी-गोवा अशी पर्यटन रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश तायल यांनी दिली.मळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तायल म्हणाले, सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथम कोकण रेल्वेचा अॅक्शन प्लान तयार केला. यानुसार सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, रत्नागिरी या रेल्वेस्थानकांचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सावंतवाडी रेल्वेस्थानकासाठी ११ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.सावंतवाडी रेल्वेस्थानकात सद्य:स्थितीत तीन ट्रॅक असून, आणखी दोन ट्रॅक वाढविण्यात येणार आहेत. सरकते जिने त्याचबरोबर प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्या, मुख्य प्रवेशद्वार, आदींबाबत विशेष काळजी घेण्यात येणार आहे.कोकण रेल्वे आतापर्यंत डिझेलवर चालत आहे. याचा खर्च वार्षिक २५० कोटी रुपयांवर जातो. कोकण रेल्वे विद्युत लाईनने जोडल्यास शंभर कोटी खर्च येणार आहे. वाचणारे पैसे इतर कामांसाठी वापरण्यात येतील. आम्ही हा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.माजी खासदार नीलेश राणे तसेच खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता तायल म्हणाले, मी आल्यापासून कोकण रेल्वेची झालेली प्रगती पहा आणि त्यानंतर मला दोष द्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.कोकण रेल्वेच्या ७४१ किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी आम्हाला १२ हजार कोटींची गरज आहे. जपान तसेच अन्य ठिकाणांवरून व्याजाने पैसे घेऊन हे प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. सद्य:स्थितीत व्याजाने पैसे घेणेही शक्य नाही. कारण कोकण रेल्वे दरवर्षी तीनशे कोटी रुपयांचा तोटा सहन करीत आहे.
सावंतवाडीत उभे राहणार‘पॅसेंजर’ टर्मिनस
By admin | Updated: February 19, 2015 02:06 IST