Join us

मध्य रेल्वेचेही प्रवासी लटकले

By admin | Updated: October 5, 2014 23:30 IST

मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वे मार्गावरही रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात आला. मात्र या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेचे प्रवासी लटकले.

मुंबई : मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वे मार्गावरही रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात आला. मात्र या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेचे प्रवासी लटकले. उशिराने धावत असलेल्या गाड्या, लोकल डब्यांना झालेली गर्दी असेच काहीसे चित्र सर्व स्थानकांवर होते. प्रत्येक रविवारी रेल्वे मार्गांवर रुळ, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या कामांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येतो. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी साडे दहा ते दुपारी साडे तीन वाजेपर्यंत जम्बोब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. धीम्या मार्गावरूनच जलद लोकल धावत असल्याने लोकल पकडताना प्रवाशांची बरीच धांदल उडत होती. अनेक प्रवासी धीम्या ऐवजी जलद लोकल पकडत असल्याने प्रवाशांना पुढील स्थानकांवर उतरून जलद लोकल पकडण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. त्यातच ३0 टक्के लोकल ब्लॉकदरम्यान धावत नसल्याने लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत होता. लोकल गाड्यांना गर्दी होत असल्याने महिला, लहान मुले आणि वृध्दांचे बरेच हाल झाले. ब्लॉक साडेतीन वाजण्याच्या सुमारास संपल्यानंतर जलद मार्ग मोकळा करण्यात आला आणि त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत झाल्या.