पंकज पाटील ल्ल अंबरनाथअंबरनाथमधील सर्वात मोठे उद्यान असलेल्या मोरिवली उद्यानात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात दारू पार्ट्या होत आहेत. विशेष म्हणजे या उद्यानात सुरक्षारक्षक असतानाही दारू पार्टी होत असल्याने उद्यानाची सुरक्षाही धोक्यात आली आहे. लाखो रुपये खर्च करून मोरिवली उद्यान उभारण्यात आले आहे. याच उद्यानात कामगार पुतळा बसविण्यात आला आहे. परिसरात हे एकमेव उद्यान असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना घेऊ न या उद्यानात येत असतात. एवढेच नव्हे तर पहाटे या उद्यानात काही ज्येष्ठ नागरिक व्यायाम आणि योगा करण्यासाठी येतात. मात्र, आता या उद्यानाचे सौंदर्य हरपत चालले असून ते आता रात्रीच्या वेळी दारू पार्टीसाठी वापरण्यात येत आहे. या परिसरातील गावगुंड रात्रीच्या वेळी घोळक्याने या उद्यानात येतात आणि कामगार पुतळ्यासमोरच बसून दारूची पार्टी करतात. पार्टी झाल्यावर दारूच्या बाटल्या आहे त्याच ठिकाणी ठेवून हे तळीराम निघून जातात. हा प्रकार नेहमीच घडत असल्याने या उद्यानात सकाळी येणारे नागरिक हा प्रकार पाहून चकित होत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पार्टी केली जाते, त्या जागेपासून २० फुटांवरच सुरक्षारक्षकांचा कक्ष आहे. या उद्यानासाठी खाजगी सुरक्षारक्षकही नेमण्यात आला आहे. असे असतानाही दारू पार्टी होते कशी, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
सुरक्षारक्षकांच्या साक्षीने मोरिवली उद्यानात पार्टी
By admin | Updated: December 27, 2014 22:37 IST