नामदेव मोरे, नवी मुंबई शहरातील दोन्ही मतदार संघांमध्ये प्रकल्पग्रस्तांची मते निर्णायक ठरतात. परंतु यावेळी बेलापूरमध्ये चार व ऐरोलीमध्ये तीन प्रकल्पग्रस्त उमेदवार नशीब आजमावत असल्याने मतांचे विभाजन अटळ असून, त्याचा लाभ नक्की कोणाला होणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. नवी मुंबईच्या विकासामध्ये भूमिपुत्रांचा वाटा मोलाचा आहे. त्यांच्याच जमिनीवर या शहराची उभारणी झाली असल्यामुळे येथील राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये भूमिपुत्रांना विशेष महत्त्व आहे. महापालिका क्षेत्रामध्ये तब्बल ३० गावे असून सावली, सोनखार, बोनसरीसारखी गावे आता फक्त नकाशावरच शिल्लक राहिली आहेत. परंतु उर्वरित गावांनी मात्र त्यांचे स्वत:चे अस्तित्व कायम ठेवले आहे. प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या पद्धतीने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश नाईक व संदीप नाईक यांनी गरजेपोटी बांधलेली घरे, गावठाणांसाठी वाढीव चटईक्षेत्र व इतर प्रश्नांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. प्रकल्पग्रस्त कृती समितीचे डॉ. राजेश पाटील यांनी मागील काही वर्षांत आंदोलनाच्या माध्यमातून एमआयडीसी व सिडकोशी संबंधित प्रश्नांवर लढा दिला आहे. गरजेपोटी घरे, भूखंड वाटप, मिठागर कामगारांच्या प्रश्नांसाठी आझाद मैदानामध्येही आंदोलन केले आहे. ते बेलापूर मतदार संघातून निवडणूक लढवत असून भूमिपुत्रांसाठी केलेल्या लढ्याची माहिती देत आहेत. काँगे्रसचे उमेदवार नामदेव भगत यांनी सिडको संचालक म्हणून गरजेपोटी घरे व व्यावसायिक बांधकाम कायम करण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. नेरूळमध्ये आगरी - कोळी भवन बांधून घेतले असून प्रचारामध्ये या मुद्यांना अग्रस्थान देण्यात आले आहे. ऐरोलीचे उमेदवार रमाकांत म्हात्रे यांनीही शासनस्तरावर सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. भाजपा उमेदवार मंदा म्हात्रे यांनी आमदार असताना जेट्टींच्या विकासासाठी भरीव काम केले आहे. बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण, मिठागर कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला आहे. भाजपाचे वैभव नाईक यांनाही गावांमधील युवकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या मतांचे होणार विभाजन
By admin | Updated: October 8, 2014 01:38 IST