Join us  

राज्यातील ४५ हजार डॉक्टरांचा संपात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 3:13 AM

मुंबईतील १२ हजार डॉक्टरांचा पाठिंबा; बाह्यरुग्ण विभाग आज राहणार बंद

मुंबई : नॅशनल मेडिकल बिलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे डॉक्टर्स आणि सरकार यांच्यात दरी निर्माण होत असून, बुधवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने राष्ट्रीय पातळीवर संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ४५ हजार डॉक्टरांनी तर मुंबईतील १२ हजार डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. या संपादरम्यान बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येतील.

डॉक्टरांच्या या संपादरम्यान आयएमएचे सदस्य खासगी आणि शासकीय रुग्णालयांतील बाह्य रुग्ण विभागात सेवा बंद ठेवतील. खासगी डॉक्टरांचे दवाखानेही बंद असतील. मात्र, शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात सरकारचे डॉक्टर्स उपस्थित असतील. तेथे रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही. पालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू राहतील. इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव डॉ. सुहास पिंगळे म्हणाले, नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात कामबंद करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून गुरुवारी सकाळपर्यंत बाह्यरुग्ण विभाग बंद राहतील. लोकसभेने एनएमसी विधेयक मंजूर करून देशातील आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण अंधारात ढकलल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने केला. या विधेयकामुळे ३.५ लाख लोक, ज्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही, अशांना औषध देण्याची संधी मिळेल. शिवाय अवैध गोष्टींना कायद्याचा आधार मिळेल, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शांतनू सेन यांनी सांगितले.

टॅग्स :वैद्यकीयमुंबईडॉक्टर