मुंबई : मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तसेच प्रत्येक मुंबईकराला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्या मतदानाच्या दिवशी पगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे़ तरीही कार्यालय खुले ठेवून आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणाऱ्यांस कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशाराच खासगी कार्यालये, दुकाने व आस्थापनांना मुंबई महापालिकेने दिला आहे़ लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ भाग २ मधील नियम १३५ ब, १ ते ३ अन्वये सर्व दुकाने व आस्थापनांना ही ताकीद देण्यात आली आहे़ हा नियम मॉल्स, नाट्यगृहे, हॉटेल, खाद्यगृहे, व्यापारी संकुल, विविध दुकाने व आस्थापनांनाही लागू आहे़ या नियमांचे उल्लंघन करणारी कार्यालये व दुकानांवर नजर ठेवण्यासाठी पालिकेने विशेष पथक स्थापन केले आहे़ खासगी कार्यालये व दुकानांवर या पथकाची नजर असणार आहे़मतदानापासून वंचित ठेवणाऱ्या कार्यालयाच्या प्रमुखाची तक्रारही कर्मचाऱ्यांना या पथकाकडे करता येणार आहे़ सुटी देऊ न शकणाऱ्या मॉल्स अथवा दुकानांनी आपल्या कर्मचाऱ्यांना काही तास मतदानासाठी जाण्याची मुभा द्यावी़ अन्यथा संबंधित दुकाने व आस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे दुकान व आस्थापना खात्याचे प्रमुख अरविंद गोसावी यांनी सांगितले़ कुठे करावी तक्रार? मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुमच्या कार्यालयाने तुम्हाला मतदानासाठी जाण्याची सूट न दिल्यास या क्रमांकावर तक्रार करावी : २३६१६९६१ अथवा २३६३५३९० असे आवाहन पालिकेने केले आहे़ (प्रतिनिधी)
लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा
By admin | Updated: October 15, 2014 05:02 IST