टीआरपी घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेला ‘बार्क’चा मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता याच्या जामीन अर्जावरील सुनावणी ९ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.
दासगुप्ता याला मुंबई क्राईम ब्रँचने डिसेंबर २०२०मध्ये अटक केली. या प्रकरणातील अन्य आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आल्याने आपलीही जामिनावर सुटका करण्यात यावी, अशी विनंती दासगुप्ता याने केली आहे. या प्रकरणी अर्णव गोस्वामी यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
पार्थो याला पाठीच्या कण्यासंबंधी विकार असल्याने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्या. पी. डी. नाईक यांच्या एकसदस्यीय खंडपीठाला सांगितले.
विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयाकडून मुदत मागितली. तसेच दासगुप्ता याने हेच कारण देत सर्वोच्च न्यायालयात अर्ज केल्याची माहितीही हिरे यांनी न्यायालयाला दिली. त्यावर पोंडा यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला अर्ज सुनावणीसाठी पुढे नेणार नाही, असे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले.
दासगुप्ताने पदाचा गैरवापर करीत एआरजी आउटलायरशी हातमिळवणी करून टीआरपी घोटाळा केल्याचा आरोप पोलिसांनी केला. १९ जानेवारी रोजी सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. कागदपत्रे पाहता दासगुप्ता याची आणखी चौकशी करणे आवश्यक आहे
अन्य आरोपींशी व्हाॅट्सॲपद्वारे झालेल्या संभाषणाबाबत आरोपीला (दासगुप्ता) पोलिसांना स्पष्टीकरण द्यावे लागेल. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा वापर करून त्याने यंत्रणेचा वापर करून टेलिव्हिजन रेटिंगमध्ये घोटाळा केला. जे सर्व करताना तो एका वृत्तवाहिनी मालकाच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना नोंदविले आहे.
गेल्याच महिन्यात दासगुप्ता याच्या शरीरात साखरेचे प्रमाण अधिक होऊन चक्कर आल्याने त्याला जे. जे. सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला आयसीयूमध्ये ठेवले होते. २२ जानेवारी रोजी त्याची रुग्णालयातून थेट तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर त्याच्या वकिलांनी जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
................................................