Join us
Daily Top 2Weekly Top 5

पार्थो दासगुप्ताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:07 IST

टीआरपी घोटाळालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेटिंग एजन्सी बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता याचा जामीन अर्ज ...

टीआरपी घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रेटिंग एजन्सी बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता याचा जामीन अर्ज बुधवारी सत्र न्यायालयाने फेटाळला.

दासगुप्ता याची टीआरपी घोटाळ्याव महत्त्वाची भूमिका आहे, असे निरीक्षण नोंदवत याआधीही दंडाधिकारी न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला होता. या निर्णयाला दासगुप्ता याने सत्र न्यायालयात आव्हान दिले. या अर्जाला विरोध करताना विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयाला सांगितले की, या घोटाळ्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असले, तरी अनेक बाबींचा तपास करणे आवश्यक आहे.

दासगुप्ता ही या घोटाळ्यातील महत्त्वाची व्यक्ती आहे आणि यंत्रणेवर त्याचे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आहे. त्यामुळे त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या सरकारी साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, असा युक्तिवाद हिरे यांनी केला.

दरम्यान, हिरे यांनी रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी व पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यामध्ये दासगुप्ता याने अन्य वृत्तवाहिन्यांना मागे टाकून अर्णव यांच्या रिपब्लिक टीव्हीला अव्वल स्थान देण्याचे आश्वासन दिल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर दासगुप्ता याच्या वकिलाने त्याच्यावर केलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्या. एम. ए. भोसले यांनी दासगुप्ता याचा जामीन अर्ज फेटाळला.

...................