Join us  

‘भानुशाली’ दुर्घटना नैसर्गिक आपत्तीमुळेच; पालिका, म्हाडाच्या अहवालाअंती पोलिसांचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 2:33 AM

अग्निशमन दलाच्या अहवालाची प्रतीक्षा

मुंबई : भानुशाली इमारत दुर्घटनेबाबत पालिका आणि म्हाडाच्या आलेल्या अहवालात अद्याप तरी कोणावरही ठपका ठेवण्यात आलेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे इमारतीचे काम थांबले आणि कोसळणाऱ्या पावसामुळे इमारतीचा काही भाग कोसळला. नैसर्गिक आपत्तीमुळे ही घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.फोर्ट येथील भानुशाली इमारतीत एकूण ५७ रहिवासी वास्तव्यास आहेत. ही इमारत ८० ते ९० वर्षे जुनी आहे. २०१३ पासून रहिवाशांकड़ून पुनर्विकासासाठी म्हाडाकडे अर्ज करण्यात आला होता. त्याला सप्टेंबर २०१९ मध्ये म्हाडाने हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार, रहिवाशांनी स्वत:हून इमारतीच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू केले. १७ जुलै रोजी इमारतीचा २५ टक्के भाग कोसळला. या दुर्घटनेत १० जणांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी एमआरए पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. आतापर्यंत सोसायटीतील रहिवाशांनीही कुणाविरुद्ध तक्रार दिलेली नाही. शिवाय, पालिका आणि म्हाडाच्या अहवालातही कुणाला दोषी ठरविलेले नाही. त्यामुळे सध्या तरी या दुर्घटनेस कोणालाही जबाबदार धरण्यात आले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.इमारत धोकादायक नाहीआतापर्यंत इमारतीला धोकादायक असे घोषित करण्यात आले नव्हते. त्यामुळे इमारत कोसळू शकते याबाबत रहिवासी अनभिज्ञ होते. घटनेच्या दिवशी १५५ मिलिमीटर पाऊस पडला होता. यात अग्निशमन दलाचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे एमआरए मार्ग पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका