Join us  

पर्रीकर यांना अन्नातून विषबाधा, लीलावती रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 10:17 PM

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अन्न विषबाधा झाली असून, उपचारासाठी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अन्न विषबाधा झाली असून, उपचारासाठी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोवा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने पर्रीकर यांना बुधवारी रात्री गोव्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तपासणीअंती त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने बुधवारी रात्रीच ते रुग्णालयातून घरी परतले. गुरुवारी सकाळी पुन्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी तपासणी करून घेतली. त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिक उपचारांसाठी पर्रीकर विमानाने मुंबईत आले आहेत. पर्रीकर यांना सध्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीची चिंता करण्याचे कारण नसल्याचे गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, डॉक्टरांनी पर्रीकर यांना दोन दिवसांची पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. या काळात कुटुंबीय सोडून इतर कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली. पर्रीकर सुखरूप असून चिंतेचे काही कारण नाही आणि लोकांनी काळजी करू नये. मात्र रुग्णालयात त्यांना लोकांना भेटण्याची मनाई करण्यात आल्याने कोणीही रुग्णालयात गर्दी करू नये, पर्रिकरांना पूर्ण विश्रांती घेऊ द्यावी, असे आवाहनही गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने आणि प्रदेश भाजपाने केले आहे.

 

टॅग्स :मनोहर पर्रीकर