पारोळ : पारोळ भिवंडी मार्गावरील माजिवली येथे नवीन बांधलेल्या दोन मोऱ्या खचल्या असून त्यावरील मार्ग दबल्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या दबलेल्या मार्गाचा अंदाज न आल्याने काही दुचाकीचालक जखमी झाले आहेत. याच वर्षी या दोन मोऱ्या नवीन बांधल्या असता त्या ठिकाणी मार्ग दबल्यामुळे हे काम निकृष्ट झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या वरून या भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराचे दर्शन घडते. हा मार्ग दबल्यामुळे एैन पावसाळ्यात हा मार्ग बंद होण्याचा मार्गावर आहे. हा मार्ग जर ऐन पावसाळ्यात खचला तर या मार्गावरील प्रवासी खाजगी वाहने बंद होऊन नोकरदार, विद्यार्थी, रूग्ण यांचे मोठे हाल होणार आहेत.हा मार्ग भिवंडीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे रोज या मार्गावरून हजारो वाहने ये-जा करतात. त्यामध्ये व्यापाऱ्याची संख्या जात आहे. त्यामुळे मे महिन्यामध्ये या मार्गाची डागडुजी करण्यात येऊन हा मार्ग पाण्याखाली जाऊ नये म्हणून माजीवली येथे दोन मोऱ्या नवीन बांधण्यात आल्यात पण त्यामुळेच आज हा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. हे निकृष्ट काम करणारा ठेकेदार व त्याची बिले अदा करणारे सार्वजनिक विभागाचे अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या भागातील नागरीकांनी लोकमतशी संवाद साधतांना दिला आहे. (वार्ताहर)
पारोळ भिवंडी मार्गाच्या मोऱ्यांचे बांधकाम निकृष्ट
By admin | Updated: June 26, 2015 23:00 IST