Join us  

राष्ट्रभक्तीचा वारसा जपणारे पार्ले टिळक विद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:57 AM

शतक महोत्सवी वर्षात प्रदार्पण; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य; मराठी अस्मिता, संस्कृती, परंपरा यांचीही जपणूक

- सीमा महांगडेविद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनवता त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणारी शाळा म्हणजे पार्ल्यातील पार्ले टिळक विद्यालय. उपनगरातली वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तेथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात व मुलांची सर्वांगीण प्रगती व्हावी, या हेतूने पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनमार्फत ही शाळा सुरू करण्यात आली. ही शाळा यंदा शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.लोकमान्य टिळक यांच्या कर्तृत्वाने व राष्ट्रवादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या काही ध्येयवादी पार्लेकरांनी लोकमान्यांचे एक सचेतन स्मारक पार्ल्यात उभारण्याचे ठरविले आणि ९ जून १९२१ रोजी पार्ले टिळक विद्यालयाच्या स्थापनेने या ध्येयास मूर्त स्वरूप आले. केवळ चार विद्यार्थी व एक शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विद्यालयाचा श्रीगणेशा झाला. चार विद्यार्थ्यांसह ९९ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पार्ले टिळक संस्थेमध्ये सध्या २६ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेअंतर्गत ५ शाळा, ३ महाविद्यालये, एक व्यवस्थापकीय शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.‘पार्ले टिळक विद्यालय’ संस्थेचा जन्म राष्ट्रीय अस्मितेतून, त्याग भावनेतून व उच्च महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. उत्तमोत्तम मुख्याध्यापक, शिक्षक यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. संचालक मंडळातील अध्यक्ष अनिल गानू, सचिव दिलीप पेठे, सहसचिव हेमंत भाटवडेकर, उपाध्यक्ष विनय जोग यांचा सक्रिय सहभाग सतत संस्थेला लाभत आहे. विद्यालयातील अनेक गुणवंत शिक्षकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आधुनिक प्रसारमाध्यमातूनही विद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. विज्ञान मंडळ, निसर्ग मंडळ, विद्यार्थी मंडळ, सहली, विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, व्यवसाय मार्गदर्शन, नकाशा मार्गदर्शन, पाठांतर स्पर्धा, हस्तलिखिते, शैक्षणिक प्रकल्प, विज्ञान प्रदर्शन, शिक्षक प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थी व शिक्षकांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.शाळा म्हणजे केवळ दगड-विटांच्या भिंती नव्हेत, तर शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास. यासाठी शाळेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. विस्तृत क्रीडांगण, क्रीडासाहित्य, शैक्षणिक साधने, अद्ययावत संगणक कक्षा, सुसज्ज प्रयोगशाळा, भूगोल दालन, समृद्ध ग्रंथालय, संगीत कक्षा, समुपदेशक कक्षा, गणित कक्षा, अत्याधुनिक चित्रकला कक्षा या सर्व सोयींचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येतो. प्राथमिकप्रमाणेच माध्यमिक विभागातही उणे शिक्षण पद्धती या शैक्षणिक उपक्रमाबरोबरच इंग्रजी अध्यपनाचे वर्ग चालतात. नाटक कलेमध्ये माध्यमिक विभागाने अनेक पारितोषिकेही पटकावली आहेत. शाळेच्या मराठी माध्यमाची धुरा सुनीता धिवार, तर माध्यमिक विभागाची जबाबदारी लतिका ठाकूर सांभाळत आहेत.बदलत्या काळानुरूप विद्यालयाच्या जुन्या वास्तूची जागा आज नव्या भव्य वास्तूने घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शाळेतही नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग अध्यापनासाठी केला जात आहे. मराठी अस्मिता, संस्कृती व परंपरा यांची जपणूक करून शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.अनेक नामवंत माजी विद्यार्थ्यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक दिवंगत पु. ल. देशपांडे, माजी हवाई दलप्रमुख प्रदीप नाईक, शेतकरी आंदोलनाचे नेते दिवंगत शरद जोशी, क्रिकेटपटू अजित पै, शहीद ले. सैन्यदल अधिकारी मकरंद घाणेकर हे या विद्यालयाची यशोपताका फडकावणारे माजी विद्यार्थी आहेत. विविध क्षेत्रांत या मान्यवरांनी विद्यालयाचेच नव्हे तर आपल्या देशाचेही नाव उज्ज्वल केले आहे.शाळेतील विविध उपक्रमदहावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन केले जाते.माजी विद्यार्थ्यांद्वारे इ. १०वीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन केले जाते.भूगोल विषयातील रुची वाढविण्यासाठी भूगोल दालनात विविध तक्ते, नकाशे, भौगोलिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.संस्थेने सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अत्याधुनिक अशी व्यायामशाळा उपलब्ध करून दिलेली आहे.शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानसिक समस्या, ताणतणाव सोडवण्यासाठी विद्यालयात समुपदेशनाची सोयआहे.विद्यालयाच्या ग्रंथालयात विविध विषयांची २६,०००पेक्षा जास्त पुस्तके आहेत.

टॅग्स :शाळा