Join us

फीवाढीविरोधात पालकांचा एल्गार

By admin | Updated: June 15, 2015 22:57 IST

येथील एज्युकेशन सोसायटीने पालक-शिक्षक संघटनेला विश्वासात न घेता १,९७० रुपये इतकी भरमसाट फी वाढवलेली आहे.

उरण : येथील एज्युकेशन सोसायटीने पालक-शिक्षक संघटनेला विश्वासात न घेता १,९७० रुपये इतकी भरमसाट फी वाढवलेली आहे. या भरमसाट फीवाढीच्या विरोधात सोमवारी पालक-शिक्षक संघटनेने शाळेच्या प्रवेशव्दारावर जाहीर व्दारसभा घेवून निषेध केला. दोन दिवसात फी वाढ मागे घेण्याचा निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालक-शिक्षक संघटनेने दिला आहे.उरण एज्युकेशन संस्थेच्या इंग्लिश मिडियम शाळेत पहिली ते १० वीचे सुमारे २८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालक - शिक्षक संघटनेला विश्वासात न घेता संस्थेने याआधीच्या ७४० रुपये फीमध्ये १९७० रुपयांची वाढ केली. या फीवाढीविरोधात पालकवर्गात तीव्र असंतोष आहे. यूईएस शाळेच्या या अन्यायकारक भरमसाट फीवाढीच्या विरोधात उरण शहर परिसरात निषेधाचे फलकही लावण्यात आले होते. त्याचबरोबर शिक्षक-पालक संघटनेचा फी वाढीबाबत कोणताही निर्णय होईपर्यंत पालकांनी वाढीव फी भरु नये, असे आवाहन करून सोमवारी शाळेच्या प्रवेशव्दारावरच व्दारसभा घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार व्दारसभा घेण्यात आली. या व्दारसभेत संघटनेचे अध्यक्ष नीलेश कदम यांनी शाळा कामकाजात पालक-शिक्षक संघटनेला संस्था फारसे महत्त्व देत नसल्याचा आरोप केला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नेहमीच अपमानास्पद वागणूक देणाऱ्या संस्थेच्या मनमानी कारभारावर कदम यांनी जोरदार टीका केली.संस्थेच्या २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या आॅडिट रिपोर्टमध्ये संस्थेला ८५ लाखांचा नफा झालेला असताना अन्यायकारक फी वाढविण्याची गरजच काय असा सवालही कदम यांनी केला. यावेळी पालक-शिक्षक संघटनेचे पदाधिकारी प्रवीण पुरो यांनीही संस्थेच्या मनमानी कारभारावर तोफ डागली. प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या पालकांशी संस्थेच्या शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक देवून फी भरायची नसेल तर चालायला लागा अशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप पुरो यांनी केला. फी वाढीबाबत संस्थेने दिलेली कारणेही तकलादू असून पालक -शिक्षक संघटनेचा फीबाबत कोणताही ठोस निर्णय होईपर्यंत पालकांनी वाढविण्यात आलेली फी भरू नये असे आवाहनही पुरो यांनी केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर आणि अन्य वक्त्यांनीही शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात टीका करून दोन दिवसात फीवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास शाळेच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पालक-शिक्षक संघटनेने दिला. (वार्ताहर)