Join us  

परमबीर सिंह यांचा जबाब लांबणीवर; हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 7:44 AM

परमबीर सिंह यांच्या भ्रष्टाचारसंबंधी  निरीक्षक दिनेश डांगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एसीबीकडून गेल्या पाच महिन्यापासून  चौकशी सुरू आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) खुल्या चौकशीमध्ये जबाब नोंदविण्यासाठीचे प्रकरण आणखी दोन आठवडे लांबणीवर पडले आहे. परमबीर सिंह यांच्या भ्रष्टाचारसंबंधी  निरीक्षक दिनेश डांगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एसीबीकडून गेल्या पाच महिन्यापासून  चौकशी सुरू आहे. त्याचा निम्म्याहून अधिक तपास पूर्ण झाला आहे. मात्र परमबीर यांचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही. त्यासाठी त्यांना १० जानेवारीला हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र ते गैरहजर राहिल्याने त्यांना १८ तारखेला हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु त्यांच्या वकिलांनी परमबीर सिंह यांची प्रकृती ठीक नसल्याने दोन आठवड्याची मुदत वाढवून मागितली. एसीबीने त्याला मान्यता दिली आहे. काय आहे प्रकरण? डांगे यांची तक्रार नोव्हेंबर २०१९ मधील आहे. डांगे ब्रीच कँडी येथील आकृती बिल्डिंगमधील पब तपासण्यासाठी गेले होते. त्यावेळी पबच्या बाहेर हाणामारी झाली आणि चित्रपट निर्माते भरत शाह यांच्या नातवाला एका पोलिसावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या प्रकरणी पब-बार मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सिंह यांनी डांगे यांना निलंबित केले व २०२० मध्ये मुंबईच्या एका पब मालकाला गुन्हेगारी प्रकरणात वाचवण्यासाठी त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे. 

टॅग्स :परम बीर सिंग