Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय सुडाचे कारण देत परमबीर सिंह चौकशी टाळू शकत नाहीत - राज्य सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार करण्यात आल्याने सूड भावनेने आपल्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार करण्यात आल्याने सूड भावनेने आपल्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, असे कारण देऊन माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह त्यांच्यावरील गुन्ह्यांसंबंधी करण्यात येणारी चौकशी टाळू शकत नाहीत, असा युक्तिवाद राज्य सरकारने उच्च न्यायालयात बुधवारी केला.

कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी व भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंह यांच्यावर दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना दोन प्राथमिक चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. या चौकशींना सिंह यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.

या दोन्ही प्रकरणांतील तपासाच्या प्रगतीबाबत न्यायालयाने चौकशी करताच सरकारी वकील जयेश याग्निक यांनी दोन्ही प्रकरणांत चौकशी सुरू असल्याचे सांगितले. सिंह यांना आतापर्यंत याबाबत समन्स किंवा नोटीस बजावण्यात आली नाही, असे सिंह यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले.

सिंह यांनी याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे हे सेवेशी संबंधित असल्याने न्यायालय त्यावर सुनावणी घेऊ शकत नाही. हे प्रकरण प्रशासकीय लवादापुढे जायला हवे, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्यायालयात केला.

तुम्ही केवळ अनिल देशमुख यांच्यावर आरोप केलेत म्हणून तुमच्यावर कारवाई होऊ शकत नाही, असे नाही. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजी तक्रार करण्यात आली. सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यापूर्वीच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत आणि कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, असा युक्तिवाद खंबाटा यांनी केला.

दोन्ही प्राथमिक चौकशी घाईत घेण्यात आल्या. ही चौकशी वैरभावनेने करण्यात येत आहे, हे स्पष्ट आहे, असे जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी ही याचिका फेटाळण्याची न्यायालयाला विनंती केली. याचिकाकर्त्यांनी संजय पांडे यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. सिंह यांनी याचिकाकर्त्यांनी अप्रामाणिकपणे सापळा रचून पांडे यांना फसवण्याचा प्रयत्न केला, असा युक्तिवाद सिरवई यांनी केला.

सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे पांडे यांनी सिंह यांची प्राथमिक चौकशी करण्यास नकार दिला. सरकारने दोन नव्या चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एक चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोचे महासंचालक करणार आहेत. तर दुसरी चौकशी अतिरिक्त मुख्य सचिव (नियोजन) करणार आहेत, अशी माहिती खंबाटा यांनी न्यायालयाला दिली.

राज्य सरकार पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याशी हातमिळवणी करून सिंह यांनी देशमुख यांच्या विरोधात लिहिलेले पत्र मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न फसल्याने त्यांनी सिंह यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल केले. अँटालिया स्फोटकेप्रकरणी पोलीस आयुक्त आणि स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट अयशस्वी ठरल्याचे वक्तव्य देशमुख यांनी केल्यानंतर सिंह दुखावले होते. याचा अर्थ त्यांनी देशमुख यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत, असे नाही, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी न्यायालयात केला. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने सिंह यांची याचिका दाखल करून घेण्यायोग्य आहे की नाही, यावरील निकाल राखून ठेवला.