Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट कोविड रुग्णांमध्ये पक्षाघात, हृदयविकारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:06 IST

महिन्याला ३०हून अधिक रुग्ण; वैद्यकीय तज्ज्ञांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनामुक्तीनंतर आरोग्याच्या तक्रारींचे प्रमाण ...

महिन्याला ३०हून अधिक रुग्ण; वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनामुक्तीनंतर आरोग्याच्या तक्रारींचे प्रमाण कमी होते, मात्र दुसऱ्या लाटेनंतर पोस्ट कोविड स्थितीत अधिक गुंतागुंत वाढल्याचे दिसून आले आहे. शहर, उपनगरात पोस्ट कोरोना स्थितीत हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

न्यूरोलॉजिस्ट डॉ. योगेश केणी यांनी सांगितले की, कोरोना संसर्गानंतर हृदयाशी संबधित गुंतागुंत तसेच धमन्यांचे विकार वाढत असल्याचे विविध प्रकारच्या अभ्यासातूनही दिसून आले आहे. कोरोना संसर्गामध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. त्या होऊ नयेत, यासाठी रक्त पातळ होण्याची औषधेही दिली जातात. मात्र, तरुण रुग्णांमध्ये हा त्रास अधिक असल्याचे दिसून येत आहे. काही रुग्णांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते. त्यातून हृदयविकार तसेच हृदयविकाराचा झटका येऊ नये, यासाठी औषधांचे व्यवस्थापन योग्यप्रकारे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिन्याभरात ३० रुग्ण उपचारासाठी येत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

कोरोनामुक्त झाल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसाचा त्रास होण्यासोबतच पक्षाघात हाेत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. कोणतीही सहव्याधी नसतानाही कोविडमुळे तरुणांमध्ये पक्षाघाताच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. केईएम रुग्णालयाच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. संगीता रावत यांनी सांगितले की, कोविडमुळे तरुणांमध्ये वाढणारी स्ट्रोकची प्रकरणे चिंतेची गोष्ट आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत कोरोनामुक्त रुग्णांमध्ये स्ट्रोकची प्रकरणे समोर आली होती. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यामुळे हे प्रमाण अधिक वाढले आहे.

* पक्षाघात झालेल्यांना बरे हाेण्यास लागताे वेळ

नानावटी रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रद्युम्न ओक यांनी पक्षाघाताच्या ४२ रुग्णांचा अभ्यास केला होता. ज्यात कोरोनाबाधित आणि कोरोना संसर्ग नसलेले रुग्ण होते. कोरोना संसर्ग झालेल्या १.४ टक्के रुग्णांना स्ट्रोक आला होता. पण, या रुग्णांचा रिकव्हरी रेट खूप कमी होता तर, काहींचा मृत्यू झाला. या कोरोना रुग्णांचे बोलणे, अवयवांची हालचाल अत्यंत कमी होती. या तुलनेत कोरोना संसर्ग नसलेले पण स्ट्रोक आलेले रुग्ण लवकर रिकव्हर झाले.

................................................................