Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंकज भुजबळ यांची चार तास चौकशी

By admin | Updated: March 3, 2015 02:48 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज पंकज भुजबळ यांची सुमारे चार तास वरळी येथील मुख्यालयात कसून चौकशी केली.

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज पंकज भुजबळ यांची सुमारे चार तास वरळी येथील मुख्यालयात कसून चौकशी केली. पंकज हे राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव असून ही त्यांच्या चौकशीची ही दुसरी फेरी होती.पंकज यांनी दुपारी वरळी येथील एसीबीच्या मुख्यालयात हजेरी लावली. त्यानुसार एसआयटीतल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. पंकज यांनी दिलेली उत्तरे त्यांचा जबाब म्हणून नोंदवून घेण्यात आला. आप नेत्या अंजली दमानिया आणि इतरानी भुजबळ आणि कुटुंबियांनी हजारो कोटींचे घोटाळे केले, असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भुजबळ व कुटुंबियांविरोधात उघड चौकशी सुरू केली. एसीबीच्या एसआयटीने या चौकशीची सुरूवात भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर यांच्यापासून केली. २० फेब्रुवारीला या प्रकरणात त्यांचा जबाबही नोंदवून घेण्यात आला. आतापर्यंत त्यांना आणखी दोनवेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले. तीन फेऱ्यांमध्ये चौकशी करूनही एसआयटीचे समाधान झालेले नाही. त्यामुळे समीर यांना उद्या पुन्हा बोलावण्यात आल्याचे एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू : भुजबळ कुटुंबियांसोबतच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचीही याप्रकरणी चौकशी सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवृत्त मुख्य अभियंता ए. व्ही. देवधर, अधीक्षक अभियंता गायकवाड, कार्यकारी अभियंता सोळंकी या तिघांचीही महाराष्ट्र सदन आणि अन्य भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत एसीबीने चौकशी केली आहे.