Join us  

आगळं 'शिवबंधन'...भुजबळांनी 'मातोश्री'वर पाठवले पेढे, काळजी घेण्याचा उद्धव यांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 5:10 PM

छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे.

मुंबई - छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. माध्यमांच्या वृत्तानुसार उद्धव ठाकरे यांनी पंकज यांना छगन भुजबळांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात तुरुंगातून जामिनावर सुटका झाली, त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे भुजबळ यांनीच आपला मुलगा पंकज भुजबळ यांना पेढे घेवून मातोश्रीवर धाडल्याची चर्चा आहे. 

पंकज यांनी मातोश्रीवर हजेरी लावल्यानंतर राजकीय गोटात विविध चर्चांना उधाण आले आहे.  उद्धव ठाकरे आणि पंकज भुजबळ यांची सुमारे 15 मिनिट भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घे असे पंकज भुजबळ यांना सांगितले. 

भुजबळ यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर शिवसेनेने सामनातून त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा काळाने घेतलेला सूड असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.  त्यातच आता पंकज भुजबळ मातोश्रीवर गेल्याने राजकीय वर्तुळात आणखी चर्चा रंगली आहे. त्यामुळे भुजबळ आणि शिवसेनेची जवळीक वाढलीय का अशी चर्चा देखील रंगू लागली आहे. 

‘सामना’त शिवसेनेने भुजबळांबद्दल काय म्हटले होते?   

''भुजबळ शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता त्याचे विस्मरण महाराष्ट्राला झालेले नाही. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा'',अशा बोचऱ्या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भुजबळांवर टीका केली आहे. 

भुजबळ पुन्हा उतरणार मैदानात; पुढच्या महिन्यात पुण्यातून 'हल्लाबोल'

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते 10 जूनला पुण्यात भाषण करणार आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतरचं भुजबळांचं हे पहिलंच भाषण असेल. सध्या राज्यभरात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरूय. या यात्रेचा शेवट 10 जूनला पुण्यात होईल. छगन भुजबळांच्या भाषणानं या यात्रेचा शेवट करण्याची योजना राष्ट्रवादी काँग्रेसनं आखली आहे. 

दोन वर्ष तुरुंगात होते छगन भुजबळ

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून १४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. ते दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगातच होते. गेल्या शुक्रवारी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. 

टॅग्स :शिवसेनापंकज भुजबळछगन भुजबळ