Join us  

पंचतंत्र, विक्रम वेताळ, बोक्या सातबंडेला पालक वर्गातून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:15 PM

लॉकडाऊन दरम्यान डी डी चॅनेलवर रामायण आणि महाभारत या दोन्ही सिरियल्स पुन्हा सुरू झाल्यानंतर आता त्या काळातील लहान मुलांच्या आवडत्या व लोकप्रिय मालिका ही पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.

मुंबई : लॉकडाऊन दरम्यान डी डी चॅनेलवर रामायण आणि महाभारत या दोन्ही सिरियल्स पुन्हा सुरू झाल्यानंतर आता त्या काळातील लहान मुलांच्या आवडत्या व लोकप्रिय मालिका ही पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.या काळात घरात बसून कंटाळलेल्या मुलांना पंचतंत्र, विक्रम वेताळसारख्या मालिकांमधून चांगली शिकवण देता येणार आहे.  शक्तिमान मालिका सुरू करण्यात आल्यानंतर आता दशकातील मालगुडी डेज, पोटलीबाबा की कहानिया , हातीम त्यानंतरच्या दशकातील शकलाका बूम बुम, बोक्या सातबंडे , गोट्या अशा मालिका सुरू कराव्यात अशी मागणी पालकवर्गाकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर डीडी नॅशनल चॅनेलवर रामायण आणि महाभारत यांना मिळणारा प्रतिसाद पाहून आता त्या काळी असलेल्या लहान मुलांच्या मालिका ही पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी या निमित्ताने होत आहे. अगदी कार्टूनमधील डकटेल्स आणि टेन्सपिन्सही बघायला आवडणार असल्याचे लोक आवडीने सांगत आहेत. 

त्या काळातील मालिका म्हणजे केवळ भांडणे ,रडारडी, मेलोड्रामा नव्हता तर त्या मालिकांतून बऱ्याच गोष्टींचे कळत नकळत मनावर संस्कार व्हायचे. मग ते जयंत नारळीकरांची ब्रम्हांड सिरिअल असो किंवा जसपाल भट्टी यांचा फ्लॉप शो. ब्रम्हांडमधे तर नारळीकरांसारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने काम केले असून त्यातून त्यांनी भावी पिढीला विज्ञानाचे धडे दिले. तसेच त्यात अंधश्रद्धा निर्मुलन म्हणजे नेमके काय ते वैज्ञानिकदृष्ट्या पटवून दिले आहे. त्यामुळे त्या मालिका विशेष असल्याची प्रतिक्रिया कृष्णा राणे यांनी दिली.

सुरभी सारख्या मालिकांमधून खूप माहिती मिळायची आणि संपूर्ण कुटूंबाला एकत्रित पाहता यायची. फुलवारी बच्चों की, अलिफ लैला, मोगली, मालगुडी डेज, मराठीतली गोट्या, बोक्या सातबंडे. मना घडवी संस्कार अशा मालिका छोटे छोटे पण महत्त्वपूर्ण संदेश ठसवायचे अशी प्रतिक्रिया सुवर्णा कळंबे यांनी दिली. अलिफ लैला, विक्रम वेताळ, अरेबियन नाइट्स, वागले की दुनिया, भारत एक खोज, मिर्जा गालिब आणि असंख्य अशा गोष्टी ज्या कधीच कालबाह्य होणार नाहीत असेही त्यांनी म्हटले. 

मनोरंजनातुन शिक्षण देणाऱ्या पंचतंत्रातील गोष्टी, विक्रम वेताळच्या प्रश्नातून आयुष्याला मिळणारे धडे यांची सध्याच्या नवीन पिढीला गरज असल्याचे मत अनेक पालक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या मालिका ही पुन्हा दाखविण्यास सुरुवात करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस