Join us

पॅनकार्डचे कार्यालय बंद ; ठेवीदार संतप्त

By admin | Updated: November 19, 2015 00:46 IST

एजंटांवर कारवाई करण्याची मागणी : कुडाळातील युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

कुडाळ : वरिष्ठ अधिकारी न आल्याने बुधवारी आयोजित केलेली बैठक झाली नाही. तर जीवितास धोका असल्याचे कारण देत कुडाळ पॅनकार्डचे कार्यालयही बंद ठेवण्यात आले. त्यामुळे ठेवीदारांमध्ये असंतोषाची लाट पसरली. त्यांनी थेट पोलीसांत धाव घेत संबंधीत एजंटावरच कारवाई करण्याची मागणी केली. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली. दरम्यान आपल्या रोजीरोटीच्या दैनंदिनीतून पैशाची बचत केलेले ठेवीदार मात्र या सर्व प्रकरणाने हवालदिल झाले आहेत. कुडाळ पॅनकार्ड क्लबमधील ठेवीदारांच्या मुदतीचा कालावधी उलटून अनेक महिने झाले, तरी ठेवीदारांचे पैसे पॅनकार्डने दिले नाहीत. त्यामुळे येथील ठेवीदारांनी व कुडाळ युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोमवारी घेराव घातला होता. शेवटी पोलिसांनी या प्रकरणात बुधवारी पॅनकार्डचे वरिष्ठ अधिकारी, एजंट व ठेवीदार यांची बैठक लावून यावर निर्णय घ्या, असे पॅनकार्डचे कुडाळचे अधिकारी विजय नाटेलकर यांना सुचविले होते व त्याप्रमाणे त्यांनी कुडाळ महालक्ष्मी सभागृहामध्ये बुधवारी सायंकाळी ४ वाजता बैठक घेण्याचे मान्य व जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी ठेवीदार बैठकीला आले. मात्र, बैठकीच्या ठिकाणी क्लबचे कोणीच अधिकारी फिरकले नाहीत. त्यामुळे बैठक जवळपास रद्द झाल्यातच जमा होती. ठेवीदारांनी कार्यालयाकडे धाव घेतली. तर कार्यालयही बंद होते. कार्यालयाबाहेर चिकटवलेल्या नोटीसमध्ये पॅनकार्डच्या सर्व मार्केटींग प्रतिनिधी, मेंबर्स यांनी बैठकीकडे दुर्लक्ष केले. मिटींगला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व मार्केटींगचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे आम्हा कुडाळ ब्रँचच्या स्टाफच्या जीवाला धोका असल्यामुळे जोपर्यंत कंपनीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडणार नाही, असा मजूकर लिहिण्यात आला होता. हा प्रकार पाहताच ठेवीदारांच्यात असंतोषाची लाट पसरली. आपल्या कमाईचे, रोजीरोटीचे पैसे मिळण्यासाठी नेमके काय करावे, हे सुचेना. ठेवीदारांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित एजंटांवरच कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी कुडाळ युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत एजंटांवरच कारवाई करण्याची मागणी करून चौकशीसाठी पोलीस निरीक्षक हेमंत शहा यांना निवेदन दिले. यावेळी तालुक्यातील ठेवीदार, युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठेवीदारांच्या गर्दीने पोलीस ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. पॅनकार्ड क्लब आता येथील ठेवीदारांच्या ठेवींच्या रकमेबाबत कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)