दीपक मोहिते, वसईपालघर जिल्हा अस्तित्वात आल्यामुळे या मतदारसंघास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्याचे मुख्यालय पालघर येथेच असल्यामुळे येथील नागरिकांना सोयीचे झाले आहे. गेली अनेक वर्षे हा तालुका विकासाबाबत मागासलेलाच राहिला आहे. नगरपरिषद असूनही शहरी भागातील बकालपणा दूर होऊ शकले नाही. राजकीय हाराकिरीमध्ये तालुक्याचे आजवर न भरून येणारे नुकसान झाले. आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे अशी इच्छाशक्तीच एकाही राजकीय पक्षाकडे नसल्यामुळे या तालुक्यात विकासाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. वसई-विरार भागातील जमिनी संपल्यामुळे आता पालघरमध्ये बांधकाम व्यवसायाला प्रचंड वेग आला आहे. वेगाने होणाऱ्या नागरीकरणामुळे या भागातील नागरी समस्यांमध्ये अधिक भर पडणार आहे. सध्या तालुक्यातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीत, अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत, परंतु त्या कागदावरच राहिल्यामुळे प्रत्यक्षात जनतेला फायदा झाला नाही. पालघर शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावरून सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. या आराखड्यात सर्वसामान्यजनांवर अन्याय झाल्याचे आरोप होत आहेत. याचे निराकरण झाले पाहिजे.नव्या पालघर जिल्ह्याचे मुख्यालय पालघर येथे स्थापन झाल्यामुळे काही प्रमाणात प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल. ज्या शहरात मुख्यालय असते त्या शहराचा झपाट्याने विकास होत असतो हा आजवरचा अनुभव आहे, पण त्यासाठी राजकीय पक्ष तसेच प्रशासकीय अधिकारी या दोघांकडे इच्छाशक्ती असावी लागते. जिह्याचे मुख्यालय आपल्याच भागात असल्यामुळे पालघरवासीयांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद दीर्घकाळ टिकायला हवा, अन्यथा ‘‘नव्या नवरीचे नऊ दिवस’’ असे होता कामा नये. गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सहन करणाऱ्या पालघरवासीयांचे जीवन यापुढे सुकर होईल अशी अपेक्षा करायला सध्या तरी हरकत नसावी. पालघर मतदारसंघ हा आदिवासी बहुल असला तरी या मतदारसंघात मच्छीमार, कुणबी, आगरी व अन्य जाती-धर्माची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. शेती, मासेमारी, वीटभट्टी, रेती उत्खनन व बांधकाम अशा नानाविध व्यवसायामध्ये स्थानिक भूमिपुत्र आपला चरितार्थ चालवत असतात. येथील कारखानदारी वाढण्याऐवजी आज ती पिछेहाटीवर आहे. या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी एकाही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही. वीज, पाणी, रस्ते, सांडपाणी निचरा इ. औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या नागरी सुविधा, सतत दुर्लक्षित राहिल्यामुळे कारखानदारी वाढली नाही. त्यामुळे येथील भूमिपुत्राच्या मुला-बाळांना वसई, मुंबई व बोईसर परिसरात रोजगारासाठी जावे लागते. ज्या तालुक्यात औद्योगिक वाढीला चालना मिळते तो तालुका विकासाच्या मार्गावर वाटचाल करतो, परंतु पालघर येथे मात्र याच्या नेमके उलटे चित्र दिसते. पक्षाच्या उदासीनतेमुळे येथील कारखानदारीला खीळ बसली.दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारली. भाजपा या तालुक्यात संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत असतानाही त्यांच्या अॅड. चिंतामण वनगा यांना ७२ हजार ४३५ चे मताधिक्य मिळाले. पक्ष विस्कळीत असताना इतके प्रचंड मताधिक्य त्यांना कसे मिळाले हा प्रश्न आज साऱ्याच राजकीय पक्षांना पडला आहे.
राजकीय कलगीतुऱ्यातून पालघरचा विकास खुंटला
By admin | Updated: July 28, 2014 00:03 IST