Join us

पालघर : भरतीला मंजूरी

By admin | Updated: June 29, 2015 23:15 IST

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लवकरच वरिष्ठ लिपीक संवर्गातील कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार असून सर्व रिक्तपदाच्या जागा भरण्यासही शासनाने परवानगी

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लवकरच वरिष्ठ लिपीक संवर्गातील कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार असून सर्व रिक्तपदाच्या जागा भरण्यासही शासनाने परवानगी दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच पूर्ण क्षमतेने काम करु शकेल अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी पत्रकारांना दिली. रिक्त जागा भरल्यानंतर कार्यालयाची कमतरता पडू नये म्हणून भाड्याच्या जागांचा शोध घेण्यास आपण सुचना केल्याचे त्यांनी सांगितले.पालघर जिल्ह्णाची निर्मिती झाल्यानंतर प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी लगेचच आवश्यक तो अधिकारी, कर्मचारीवर्ग उपलब्ध न झाल्याने कामे वेळेवर होत नसल्याची ओरड सुरू झाली होती. परंतु उपलब्ध संख्याबळाच्या जोरावर जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार योजना, आरोग्य यंत्रणात बदल, वनहक्क दावे, कुपोषण, स्थलांतर रोखणे, आश्रमशाळा इ. विविध विकासात्मक कामांची यशस्वीरित्या सुरूवात केली होती. अलिकडेच उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पाच पदांना मंजुरी मिळाल्याने या विकासकामातील अडथळे दूर झाले होते. तरीही या अधिकाऱ्यांच्या हाताखाली पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध होत नसल्याने कामे हवी त्या वेळेत पुढे होत नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याने मंत्रालयीन पातळीवरून पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कोकण विभागीय आयुक्तांनी पालघर जिल्ह्णासाठी ४५ वरीष्ठ लिपीक कर्मचारी पदांना मान्यता दिली आहे. यातील ३० पदे लागलीच भरली जाणार आहेत. ठाणे जिल्ह्णाच्या आस्थापनेमधून हा कर्मचारीवर्ग दिला जाणार असल्याचे समजते.जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आजमितीस १०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार असून भरती प्रक्रियेद्वारा ही पदे भरली जाणार आहेत. प्राथमिक पातळीवर शासनाने चार टक्के भरतीलाच मंजुरी दिली असून शंभर टक्के भरतीस मंजुरी मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याने शासन स्तरावरून लवकरच याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षा सर्व बाळगून आहेत. लवकरच शंभर टक्के भरतीला मान्यता मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय समस्यांचा निपटारा करेल व विकासात्मक निर्णय घेण्यास पुर्ण सक्षम ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी बांगर यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)