Join us

पालघर जिल्ह्यात ६२ टक्के

By admin | Updated: January 28, 2015 23:26 IST

पालघर जिल्हापरिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ८ पंचायत समितीच्या शांततेत पार पडलेल्या पहिल्याच निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले.

पालघर : पालघर जिल्हापरिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ८ पंचायत समितीच्या शांततेत पार पडलेल्या पहिल्याच निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले. यात कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही. जि. प. च्या ५७ गटासह पंचायत समितीच्या ११४ गणासाठी एकूण ६२ टक्के मतदान झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी सांगितले.पालघर जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच जिल्हापरिषद अस्तित्वात येणार आहे. पालघर जिल्हापरिषदेसह पालघर तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, वसई पंचायत समित्यांसाठी बुधवारी सकाळी ७.३० वा. मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारीया यांनी केंद्राना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला.पालघर जिल्हयात मागील दहा महिन्याच्या कालावधीत लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका पार पडल्याने मतदार निवडणूक प्रक्रियेला पुरता कंटाळल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या सत्रात पालघर (अ) ७.६४ , पालघर १०.८९ , वाडा ७.१२ , वसईत ८.१२, मोखाड्यात ५.१३ , जव्हार ६.५२, विक्रमगड ६.४०, तर तलासरी १६.३९ टक्के मतदान झाले. मात्र दुपारनंतर मतदान केंद्राकडे मतदारांनी हळूहळू आपली उपस्थिती नोंदविण्यास प्रारंभ केला.पालघर जिल्ह्यातील मतदानाची संध्याकाळची पाच वाजेपर्यंतची वेळ संपल्यानंतर पालघर ६० , डहाणू ५९ , मोखाडा ५८ , तलासरी ६७.५६ , पालघर (अ) ६०.६४ , विक्रमगड ६० , जव्हार ६७.२० तर वसई ६५ टक्के मतदान झाले. अनेक भागात मतदानाच्या स्लीप पोहाचल्या नसल्याने शेकडो मतदारांनी तक्रारी केल्या. हे काम तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, ग्रा. प. कर्मचारी यांच्याकडे होते. त्यांनाच त्या उशीर मिळाल्याने मतदाराना त्या वेळीच मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे राजकीय बुथवर मतदारांची एकच गर्दी दिसत होती.