वसई/पालघर : दिवाळी संपण्यास एक दिवसाचा कालावधी उरला आहे. त्यानंतर सरकार स्थापनेच्या व मंत्रीमंडळ साकारण्याच्या हालचालींना गती येणार असून पालघर जिल्ह्यातून भाजपच्या कोट्यातून ज्येष्ठ आमदार विष्णू सवरा आणि तीन आमदारांसह पाठिंबा देणाऱ्या बविआच्या कोट्यातून विलास तरे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सवरा हे आधी वाडा मतदारसंघाचे अनेक वर्षे आमदार होते. नंतर वाडा मतदारसंघ भिवंडी ग्रामीणमध्ये रुपांतरीत झालेल्या मतदारसंघाचेही ते गेली पाच वर्षे आमदार होते. जेव्हा चिंतामण वनगा हे विक्रमगडचे आमदार पालघरचे खासदार झाले. तेव्हा विक्रमगड या मतदारसंघात ते या निवडणुकीला उभे राहिलेत आणि निवडून आलेत. त्यांची ज्येष्ठता व आदिवासी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना मंत्री मंडळात कॅबीनेट मंत्रीपद आणि पालघरचे पालकमंत्रीपद मिळण्याची चिन्हे आहेत. तर तीन आमदारांसह भाजपच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या बविआ तर्फे बोईसरचे आमदार विलास तरे यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. ते ही दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झालेले आहेत. जर भाजप-शिवसेना असे संयुक्त सरकार आले तर मंत्रीपदांची विभागणी होईल आणि वाट्याला आलेल्या मंत्रीपदातून एकाच जिल्ह्यात दोन मंत्री करणे तसे अवघड असले तरी पालघर हा नवा जिल्हा असल्यामुळे व त्यात भाजपला बस्तान मजबूत करायचे असल्याने तिथे सावरांच्या रुपाने कॅबीनेट मंत्री देणे व त्यांनाच पालकमंत्री करणे अशी खेळी खेळली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. बविआ हा मित्रपक्ष आणि त्याच्या तीन आमदारांचा पाठिंबा हे लक्षात घेऊन बविआच्या वाट्याला एक राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता असून ते तरेंना मिळण्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर पालघर जिल्ह्याच्या निर्मीतीनंतर एक कॅबीनेट आणि एक राज्यमंत्री मिळण्याचे भाग्य त्याला लाभेल. या पूर्वी ताराबाई वर्तकांच्या रुपाने या आदिवासीपट्ट्याला कॅबीनेट मंत्रीपद लाभले होते. त्या वसंतदादांच्या मंत्रीमंडळात गृहनिर्माण मंत्री होत्या.
पालघरमधून तरे, सावरा मंत्री?
By admin | Updated: October 23, 2014 23:51 IST