Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या विरोधामुळे पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींचा शो रद्द

By admin | Updated: October 7, 2015 21:25 IST

गझल गायक गुलाम अली यांचा ९ ऑक्टोबररोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात होणारा शो शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे आयोजकानी कार्यक्रम रद्द केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ७ -  गझल गायक गुलाम अली यांचा ९ ऑक्टोबररोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात होणारा शो शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे आयोजकानी कार्यक्रम रद्द केला आहे. शिवसेनेने केलेल्या विरोधाच्या धरतीवर आयोजक उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. पण त्यामधून काहीही सार्थ झाले नाही. त्यामुळे आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे सचिव अक्षय बद्रापूरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी षण्मुखानंद सभागृहात जाऊन कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. 
शिवसेनेने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवला असून पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द करा अशी मागणी आयोजकांकडे केली होती. शो रद्द न केल्यास शिवसेना स्टाईल विरोध करु असा धमकीवजा इशाराच शिवसेनेने दिला होता. 
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांवर आक्षेप आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात कार्यक्रम करु देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने नेहमीच मांडली आहे. आता गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा पाकविरोधी सूर आळवला आहे. 
 
भारतीय जवानांना मारणा-या पाकसोबतच्या सांस्कृतिक संबंधांना आमचा विरोध असल्याचे अक्षर बद्रापूरकर यांनी सांगितले. हा शो रद्द करावा अशी मागणी करणारे पत्र बद्रापूरकर यांनी आयोजक व षण्मुखानंद प्रशासनाला दिले होते.