Join us  

पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप - वीरमाता अनुराधा गोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 6:37 PM

"आजही देशासाठी सीमेवर लढण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती व्हावे."

मुंबई - अखंड भारताची फाळणी झाली आणि २० ऑक्टोबर १९४७पासून पाकिस्तान समवेत प्रदीर्घ युद्ध झाले. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून आपला प्रदेश मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतू तत्कालीन सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली. अन्यथा पाकव्याप्त कश्मीर हे दुखणे भारतीय लष्कराने तेंव्हाच मिटविले असते, अशा शब्दांत कँप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री आणि ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपले प्रखर विचार मांडले. 

बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या'ओंजळीतील फुले' या पुस्तकाचे प्रकाशन मागाठाणे पोलीस चौकी जवळील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारंभात, वीरमाता अनुराधा गोरे, सुप्रसिद्ध संवादिनी, साहित्यिक मंगला खाडिलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या हस्ते कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करुन करण्यात आले. 

यावेळी अनुराधा गोरे यांनी, आपल्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांची माहिती आपल्याला नसावी, याबद्दल खंत व्यक्त केली. आजही देशासाठी सीमेवर लढण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. रेखा बोऱ्हाडे यांच्या पुस्तकातील लिखाणाचे तोंडभरून कौतुक करून अनुराधा गोरे यांनी पैशांपेक्षा खरी श्रीमंती कशात आहे, हे त्यांनी आपल्या पुस्तकातून दाखवून दिले आहे, असेही सांगितले. 

मंगला खाडिलकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोऱ्हाडे यांच्या लेखनशैलीचा मुक्तकंठाने गौरव करून हे लिखाण आपल्या ह्रुदयातून आले असल्याने ते अतिशय उत्तम झाले आहे, अशा शब्दांत शाबासकी दिली. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांचे नवीन भूमिकेबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख मनोहर देसाई, लता पाटील यांचीही लेखिकेच्या कार्याला शुभेच्छा देणारी भाषणे झाली. 

लेखिकेने आपल्या प्रास्ताविकात पुस्तकाच्या निर्मितीची मिमांसा आणि आपला प्रवास थोडक्यात सांगून समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मिथून पाटील यांनी सूत्रसंचालन तर कन्या शिवानी बोऱ्हाडे- धुळे यांनी आभार प्रदर्शन केले. 

टॅग्स :जम्मू-काश्मीरपीओके