मुंबई : आर्थिक वर्ष संपत आल्यामुळे दौऱ्यासाठी राखीव वार्षिक निधी वाया जाणार आहे़ त्यामुळे तुर्कस्तान दौऱ्याची हौस गटनेत्यांनी भागविल्यानंतर आता विशेष समिती सदस्यांनाही दौऱ्याचे वेध लागले आहेत़ मात्र हा अभ्यास दौरा स्वदेशातच असला तरी त्यातही विमान प्रवासाचा खर्च मंजूर करण्याची गळ सदस्यांनी घातली आहे़ या प्रस्तावांना गटनेत्यांनी आज हिरवा कंदील दाखविला़विविध प्रकल्पांच्या नावाखाली दरवर्षी गटनेते, विविध समित्यांचे दौरे निघतात़ गटनेते व नेत्यांची परदेशी दौऱ्याची हौस पालिकेच्या तिजोरीतूनच भागविण्यात येते़ मात्र त्या शहरातून आणलेले प्रकल्प व त्यांचे अहवाल कधीच प्रत्यक्षात साकारत नाहीत़ दर्जेदार रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, बीआरटीएस असे परदेशी प्रकल्प या दौऱ्यांचे आकर्षण ठरले आहे़ अशा एका दौऱ्याचा वर्षभरापूर्वी गटनेत्यांनी आखलेला बेत गेल्या आठवड्यात पूर्ण केला़ तुर्कस्तान, इस्तानाबूल दौऱ्यातून केवळ रेस्टॉरंट सुरू करण्याची कल्पनाच तेवढी गटनेत्यांना भावली़ त्यामुळे या बिनकामाच्या दौऱ्यानंतर सार्वजनिक आरोग्य समिती, स्थापत्य समिती (शहरे) आणि महिला व बाल कल्याण समितीने दौऱ्यावर जाण्याची तयारी सुरू केली आहे़ या प्रस्तावांना गटनेत्यांच्या बैठकीत आज मंजुरी मिळाली़ मात्र आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतरच ही टूर निघू शकेल़ (प्रतिनिधी)
रंगताहेत पिकनिकचे बेत
By admin | Updated: January 15, 2015 02:10 IST