Join us  

वेदनेतून सृजनशील साहित्याची निर्मिती होते- फादर फ्रान्सिस दिब्रेटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 12:36 AM

वेदना माणसाला अंतर्मुख करते, त्यातून साहित्य हे याच वेदनेतून निर्माण होत असते.

मुंबई : वेदना माणसाला अंतर्मुख करते, त्यातून साहित्य हे याच वेदनेतून निर्माण होत असते. सृजनशील साहित्याची निर्मिती अशा वेदनेतून होत असते, असे प्रतिपादन ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.फादर दिब्रिटो यांच्या हस्ते ‘साहित्य’ या विशेषांकाचे आणि ‘आषाढी’ या अक्षर साहित्याचे प्रकाशन करण्यात आले. ‘साहित्य’चा अंक रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्यावर आधारित आहे. या सोहळ्याला साहित्य संघाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक उपस्थित होते. याप्रसंगी, भाषा, साहित्य, नाट्य, सामाजिक कार्य या क्षेत्रांत काम करणाऱ्या नऊ व्यक्तींचा वर्धापन दिन सोहळ्यात ‘साहित्य सेवा गौरव’ पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.फादर दिब्रिटो म्हणाले की, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, असे म्हटले जाते. मात्र, ज्यांनी खºया अर्थाने असे काम केले, ते फादर थॉमस स्टिफन्स अंधारात राहिले. फादर स्टिफन्स ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने महाराष्ट्रात आले होते. मात्र, ते इथल्या धर्म, संस्कृती, भाषेशी एकरूप झाले. त्यांनी मराठीतून ‘ख्रिस्तपुराण’ ग्रंथ लिहिला. ख्रिस्ती-हिंदू बंधू आहेत, हे त्यांनी ४०० वर्षांपूर्वी सांगितले. आपण एकमेकांना जाणून घेत नाही. एकमेकांमध्ये मिसळत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होतात.मधू मंगेश कर्णिक म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक साहित्यिकांसाठी क्लेशदायक असते. एका साहित्यिकाला हरवून दुसरा साहित्यिक जिंकतो, हे अनुभवले आहे. त्यामुळे फादर दिब्रिटो यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, याचा आनंद आहे. आपला साधनेचा धर्म कोणताही असला, तरीही आपण धर्मा-धर्मामध्ये सेतू बांधला पाहिजे, हे त्यांनी अधोरेखित यावेळी केले.