मुंबई : वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या गर्दीत चोरट्यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा आयफोन घेऊन पळ काढला. मोबाइल चोरल्याचे लक्षात येताच, कोल्हापुरे यांच्या मुलाने ताडदेव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.एनएससीआयमध्ये १६ ते १७ आॅक्टोबर दरम्यान विविध कपड्यांच्या डिझाइनचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात कोल्हापुरे यांच्याही फॅशन ब्रॅण्डचा स्टॉल होता. त्यामुळे त्या मुलगा प्रियांक प्रदीप शर्मासोबत या प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. १७ तारखेला सायंकाळी त्या स्टॉलकडे आल्या. तेथे गर्दी असल्याने साडेपाचच्या सुमारास कोल्हापुरेयांनी त्यांचा आयफोन ८ स्टॉलच्या टेबलावर ठेवला. तेथे आलेल्या लोकांशी त्या चर्चा करत होत्या. १५ मिनिटांनी त्यांनी मोबाइल घेण्यासाठी टेबलाकडे पाहिले तेव्हा मोबाइल चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी सगळीकडे शोध घेतला, मात्र कुठेच मोबाइल दिसून आला नाही. अखेर त्यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा एक व्यक्ती टेबलावरील मोबाइल चोरी करताना दिसला. अखेर त्यांचा मुलगा प्रियांक प्रदीप शर्मा याने सीसीटीव्ही फुटेजसह ताडदेव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याच फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पद्मिनी कोल्हापुरेचा मोबाइल चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 05:42 IST