Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मावती’चा सेट पेटविला

By admin | Updated: March 16, 2017 03:54 IST

राजस्थानमध्ये विरोध झाल्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘द लिजंड आॅफ पद्मावती’ या चित्रपटाचे पन्हाळ्याजवळील मसाई पठारावर सुरू

कोल्हापूर : राजस्थानमध्ये विरोध झाल्यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘द लिजंड आॅफ पद्मावती’ या चित्रपटाचे पन्हाळ्याजवळील मसाई पठारावर सुरू असलेल्या चित्रीकरणाचा सेटही मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांनी पेट्रोल बॉम्बने पेटवून दिला. जमावाने जनरेटर व्हॅनसह पाच वाहनांची तोडफोड करीत सुरक्षारक्षकास मारहाण केली. त्यामध्ये राजू, आवदेश व फैयाज हे कामगार जखमी झाले. आगीमध्ये ७०० ते ८०० किमती पोशाख, चित्रीकरणाचे साहित्य असे सुमारे एक कोटीचे नुकसान झाले.मसाई पठारावर ५ मार्चपासून चित्रीकरण सुरू आहे. मसाईवर बुधवारी युद्धतयारीचे चित्रीकरण करण्यात येणार होते. यासाठी भव्य रथ तयार करण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. क्रेनच्या साहाय्याने ६० फुटी भव्य युद्धध्वज उभारण्यात येणार होता. शिवाय कोल्हापूर परिसरातील ४०० हून अधिक स्थानिक कलाकारांचा समावेश करण्यात येणार होता. यामध्ये उंट, हत्ती, बैल आणि घोड्यांचा समावेश होता. मसाई पठारावर या चित्रीकरणाची तयारी सुरू असतानाच, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या पठाराच्या दरीच्या बाजूला असलेल्या वेखंडवाडी परिसरातून अचानक दहा ते पंधरा जणांनी बिअरच्या बाटलीत पेट्रोल भरून पेटते गोळे साहित्यावर फेकल्याने परिसराला आग लागली. आग पसरत जाऊन तबेलापर्यंत पोहोचली. कर्मचाऱ्यांनी प्रथम घोडे वाचविण्याचा प्रयत्न केला. तरीही एका घोड्याला धग लागून तो जखमी झाला. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात अज्ञात दहा ते पंधरा राजपूत लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निर्माता चेतन भालचंद्र देवळेकर (वय ३४, रा. माहीम, मुंबई) यांनी फिर्याद दिली. (प्रतिनिधी) मी स्वत: घटनास्थळी भेट दिली असता पेट्रोल व सोडवॉटरच्या बाटल्या आढळल्या. सुमारे एक कोटीपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तिघा कर्मचाऱ्यांना मारहाणही झाली आहे. चित्रपट निर्मात्यांची फिर्याद देण्याची मानसिकता नव्हती; परंतु त्यांना फिर्याद देण्यास सांगितले आहे. यापूर्वी दिवसा दहा पोलिसांचा बंदोबस्त दिला होता. रात्रीचा पोलिस बंदोबस्त न घेतल्याने हा प्रकार घडला आहे. आठ दिवसांनी पुन्हा चित्रीकरण सुरु होणार आहे. त्यासाठी सशस्त्र पोलिस बंदोबस्त देण्यात येईल.-विश्वास नांगरे-पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक. विमा रकमेसाठी स्टंट?चित्रीकरण सुरू होऊन नऊ दिवस होईपर्यंत कोणीही विरोध केलेला नव्हता किंवा तसे निवेदनही कोणी दिलेले नव्हते. चित्रीकरण अंतिम टप्प्यात आल्यामुळे विम्याच्या रकमेसाठी हा स्टंट केला असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.