Sudhir Mungantiwar on OYO Hotel Chain: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सुधीर मुनगंटीवार हे सातत्याने सरकारच्या निर्णयांवरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना दिसत आहेत. अशातच सुधीर मुनगंटीवार यांनी आणखी एका मुद्द्यावरुन सरकारचे लक्ष वेधून घेतलं आहे. जागतिक ट्रव्हल टेक प्लॅटफॉर्म ओयो चेनशी संलग्न हॉटेल्स आणि लॉजिंगवरुन मुनगंटीवार यांनी सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी ओयो संदर्भातील मुद्दा मांडला. महाराष्ट्रात किती ओयो हॉटेल्स आहेत आणि त्यात नेमकं काय घडतंय, याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी घ्यायला हवी असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसेच ओयो हॉटेल्समध्ये खोल्या एकेक तासासाठी भाड्याने मिळत असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या सर्वांसाठी कोणतीही परवानगी नसल्याचेही मुनगंटीवार यांनी म्हटलं.
"एकीकडे महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडत असताना ओयो नावाची एक हॉटेल साखळी तयार झाली आहे. मनात शंका आली की ही ओयो हॉटेल साखळी काय आहे. या अतिशय गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष्य देण्याची गरज आहे. या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतीची, नगरपरिषदेची, महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही. या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. ती कशासाठी दिली जाते? हा पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे. ओयोच्या हॉटेलमध्ये २०-२० किलोमीटर जाऊन कुणीही प्रवासी राहात नाही. कारण हा प्रवासी जर तिथपर्यंत जात असेल, तर त्याचं अर्थशास्त्र कच्चं आहे. कारण जाण्या-येण्याच्या टॅक्सीला जितका खर्च येतो, त्यापेक्षा शहरातल्या एका हॉटेलमध्ये राहणं जास्त परवडतं. पण ते लोक ओयोमध्ये जातात," असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
"खरंतर महाराष्ट्रात संस्कृतीरक्षकांचं सरकार आहे. इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल, तर गृहराज्यमंत्र्यांनी ओयोचा अभ्यास करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात किती ओयो हॉटेल आहेत, याची माहिती त्यांनी देण्याची गरज आहे," असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.