Join us  

Oxygen Shortage: अनर्थ थोडक्यात टळला! सव्वा तासात ऑक्सिजन सिलिंडर पोहोचले; ६१ रुग्णांचे प्राण वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 6:27 AM

मुंबई पालिकेची कामगिरी, पोहोचवले नऊ जंबो सिलिंडर

मुंबई : घाटकोपर येथील हिंदू महासभा या खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी ऑक्सिजन पुरवठा संपत आल्याने धावपळ उडाली होती. येथील ५० रुग्ण ऑक्सिजनवर, तर ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याने चिंता वाढली होती. रुग्णालय व्यवस्थापनाने मुंबई महापालिकेला लगेच संपर्क केला. पालिकेच्या पथकाने नऊ जंबो सिलिंडर सायंकाळी ६.१५ वाजता रुग्णालयात पोहोचविले. त्यामुळे रुग्णालयातील साठा संपण्यास काही मिनिटे उरली असताना ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत करण्यात येऊन रुग्णांचे प्राण वाचले.ऑक्सिजन पुरवठा संपत आल्याने पालिकेच्या सहा रुग्णालयांमधील १६८ कोविड रुग्णांना रात्रीच्या वेळेत अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्याची वेळ गेल्याच आठवड्यात मुंबई महापालिकेवर आली होती. अशी वेळ पुन्हा येऊन नये यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी, अन्न व औषध प्रशासन, प्राणवायू पुरवठादार यांच्याशी समन्वय राखण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची २४ तास नियुक्ती केली आहे. तसेच पालिकेने नेमलेली पथके ऑक्सिजनचे उत्पादन ते वितरण होईपर्यंतच्या साखळीवर लक्ष ठेवून आहेत. या यंत्रणेने बुधवारी मोलाची कामगिरी बजावली.व्यवस्था उभारण्यासाठी आज बैठकऑक्सिजन पुरवठासंदर्भात भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून, या रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन व्यवस्था उभी करण्याविषयी एन विभागाचे सहायक आयुक्त अजित आंबी यांच्या कार्यालयात गुरुवारी रुग्णालयात व्यवस्थापनाबरोबर बैठक बोलावण्यात आली आहे.सायं ६.१५ला पोहोचला रुग्णालयात ऑक्सिजन महापालिकेच्या एस (भांडूप) विभागातून नऊ जंबो सिलिंडर या रुग्णालयात सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचविण्यात आले. त्या व्यतिरिक्त रुग्णालयाच्या नियमित ऑक्सिजन पुरवठादाराने चार ड्युरा सिलिंडर सायंकाळी ६.१५च्या सुमारास पोहोचवले. ते जोडून त्वरित ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच एन (घाटकोपर) विभागातून १५ जंबो सिलिंडर बॅकअप म्हणून त्वरित पाठविण्यात आले. रुग्णांना इतर ठिकाणी नेण्याची गरज भासली तर त्यासाठी रुग्णवाहिकादेखील सुसज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या