Join us  

औषधांच्या बिलांची थकीत रक्कम दोन दिवसांत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 5:31 AM

राज्य सरकारने औषध वितरकांचे २४६ कोटी रुपये थकविले आहेत. या पार्श्वभूमीवर वारंवार पत्रव्यवहार करूनही दाद मिळत नसल्याने आॅल फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनने ३१ मार्चपासून औषधांचा पुरवठा थांबविण्याचा इशारा दिला होता.

मुंबई : राज्य सरकारने औषध वितरकांचे २४६ कोटी रुपये थकविले आहेत. या पार्श्वभूमीवर वारंवार पत्रव्यवहार करूनही दाद मिळत नसल्याने आॅल फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनने ३१ मार्चपासून औषधांचा पुरवठा थांबविण्याचा इशारा दिला होता. मात्र गुरुवारी संतप्त झालेल्या फाउंडेशनच्या सदस्यांनी हाफकिन बायो फार्मासिट्युटीकल कॉर्पोरेशनमध्ये ठिय्या दिल्यानंतर अखेर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने याची दखल घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. चर्चेअंती दोन दिवसांत थकीत बिलांची रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले आहे.राज्य सरकारकडून औषध वितरकांचे पुन्हा तब्बल २४६ कोटी रुपये थकविण्यात आले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या वितरकांनी ३१ मार्चपर्यंत पैसे न मिळाल्यास राज्य सरकारला औषधपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गुरुवारच्या बैठकीत दोन दिवसांत थकीत बिलांची रक्कम देण्याचे आश्वासन डीएमईआरने दिले आहे. जानेवारी २०१९ मध्ये वितरकांनी औषधांचा पुरवठा करून तीन महिने उलटले तरी त्यांची बिले अद्याप मंजूर झालेली नाहीत.जानेवारीमध्ये वितरकांनी २४६ कोटींची औषधे दिल्यानंतर त्यांना बिलाची ९० टक्के रक्कम लवकरच मंजूर होईल आणि उर्वरित १0 टक्के रक्कम महिनाभरात मंजूर होईल, असे हाफकीनकडून सांगण्यात आले.परंतु प्रत्येक वितरकाच्या बिलाची पद्धत वेगवेगळी असल्याने फेब्रुवारीमध्ये त्यांना सरकारच्या नियमानुसार बिले देण्यास सांगण्यात आले.

टॅग्स :औषधं