Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात, तरीही रुग्णालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. कोरोनामुक्त झाल्यानंतरही वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. कोरोनामुक्त झाल्यानंतरही वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. विशेष म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, आदी व्याधी असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईत रुग्णालयात बेड कमी असल्याने कोरोनामुक्तीनंतर काही आजार असल्यास रुग्णांना ओपीडीमध्ये बोलावले जाते. त्यांना दाखल करून घेतले जात नाही.

काही नागरिकांना कोरोनामुक्तीनंतर म्युकरमायकोसिस या जीवघेण्या आजारासह विषाणूजन्य इन्फेक्शन होण्याचे प्रकार समोर आले. रक्त घट्ट होणे, गाठ येणे, हाडे ठिसूळ होणे अशा एक ना अनेक विविध तक्रारी संबंधित रुग्ण सहन करीत आहेत. या आजारामुळे त्रस्त होणारे नागरिक आता शासकीय रुग्णालयातील पोस्ट-कोरोना ओपीडीत धाव घेत आहेत, तर अनेक रुग्ण खासगी डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घेत आहेत. वाढलेल्या या तक्रारी पाहता, आपल्याला कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर, आदी प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

कोरोनातून बरा, पण श्वसनाचा त्रास

कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्णांना श्वसनाचा त्रास, प्रचंड डोकेदुखी, आदींचा त्रास होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये श्वसनाचे विविध विकार असल्याच्या तक्रारी अधिक आहेत. यासोबतच चालताना दम लागणे, फुप्फुसाचे विविध आजार जडले आहेत.

बरे झाल्यानंतर ही घ्या काळजी

कोरोनामुक्त झाल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुक्तीनंतर काही काळ दगदग न करता आराम करणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घेण्यासह चांगला व सकस आहार घेणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, योगा करणे गरजेचे आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

ज्येष्ठांनी काळजी घेणे आवश्यक

कोरोनाचा धोका सुरुवातीपासूनच व्याधिग्रस्त ज्येष्ठांना होता. कोरोनानंतर रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित अडचणींमध्ये तीव्र वाढ झाल्याचे दिसून येते. कोरोनामुक्तीनंतर श्वास घेण्यास त्रास होणे, चालताना दम लागणे यांसह इतर होणारे आजार अधिक प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोरोनामुक्तीनंतर ज्येष्ठांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

कोट :

कोरोनामुक्तीनंतरही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, योगा व श्वसनासंबंधी व्यायाम करणे गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली, दुसऱ्या टप्प्यात तरुण आणि गर्भवतींना लागण झाली; पण त्यांच्यात अँटीबॉडी तयार झाली आहे. लसीकरण न झाल्यामुळे लहान मुलांना धोका आहे; पण असे असले तरी सर्वांनी त्रिसूत्री पाळली पाहिजे.

- डॉ. रमेश भारमल, संचालक, पालिका रुग्णालय