Join us  

हवेच्या प्रदूषणाने राज्यात एक लाखाहून अधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 5:04 AM

भारतात २0१७ मध्ये १२.४ लाख नागरिकांचा हवेच्या प्रदूषणाशी निगडित आजारांमुळे मृत्यू झाला व यापैकी एक लाखाहून अधिक मृत्यू महाराष्ट्रातील होते, असे गंभीर चित्र जागतिक अभ्यास पाहणीच्या निष्कर्षांतून समोर आले.

मुंबई : भारतात २0१७ मध्ये १२.४ लाख नागरिकांचा हवेच्या प्रदूषणाशी निगडित आजारांमुळे मृत्यू झाला व यापैकी एक लाखाहून अधिक मृत्यू महाराष्ट्रातील होते, असे गंभीर चित्र जागतिक अभ्यास पाहणीच्या निष्कर्षांतून समोर आले. हवेत तरंगणारे व श्वसनावाटे सहजपणे शरीरात जाऊ शकणारे अतिसूक्ष्म धुलीकण हा नागरिकांच्या आरोग्यास तंबाखूहून मोठा धोका ठरत असलयचेही या अहवालात म्हटले आहे.‘लान्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’ या वैज्ञानिक नियतकालिकात अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार गेल्या वर्षी भारतात हवेच्या प्रदूषणामुळे मृत्यू पावलेल्या १२.४ लाख नागरिकांचे वय ७० वर्षांहून कमी होते. सार्वजनिक ठिकाणच्या हवेसाठी राष्ट्रीय पातळीवर ‘अ‍ॅम्बियंट एअर क्वालिटी’च्या ज्या मर्यादा ठरल्या आहेत, त्याहून जास्त प्रदूषित हवेत ७७ टक्के भारतीय नागरिकांना सतत वावरावे लागते.अहवालानुसार हवेच्या प्रदूषणामुळे गतवर्षी सर्वाधिक २.६० लाख एवढे मृत्यू उत्तर प्रदेशात झाले. त्या खालोखाल १.०८ लाख मृत्यू झालेल्या महाराष्ट्राचा व बिहारचा (९६,९६७) क्रमांक लागतो. जागतिक पातळीवर हवेच्या प्रदूषणामुळे होणारे मृत्यू व येणारे आजारपण यात भारताचा वाटा २६ टक्क्यांचा आहे. आजारपण आणि मृत्यू येण्याएवढी हवा प्रदूषित झाली नसती तर भारतातील अपेक्षित सरासरी आयुष्यमान १.७ वर्षाने आणखी वाढू शकले असते, असेही तज्ज्ञांनी अहवालात नमूद केले.देशातील सर्व राज्यांमधून गोळा केलेल्या विश्वसनीय आकडेवारीचे विश्लेषण करून अहवालात असाही निष्कर्ष काढला गेला की, गतवर्षी हवेच्या प्रदूषणाशी निगडित अशा एकूण १२.४ लाख मृत्यूंपैकी ६.७ लाख मृत्यू घराबाहेर वावरताना सोसाव्या लागणाऱ्या अतिसूक्ष्म धुलीकणांच्या त्रासामुळे तर बाकीचे ४.८ लाख मृत्यू घरातीलच प्रदूषित हवेमुळे झाले.>हे धुलीकण कसले?२.५ एमएपहून कमी आकाराचे हवेत तरंगणारे धुलीकण आरोग्यास हानीकारक मानले जातात. भारतात कोळशावर चालणारी औष्णि विद्युत केंद्रे, औद्योगिक कारखान्यांची धुरांडी, बांधकामे, विटांच्या भट्ट्या, वाहनांमधून सोडले जाणारे धूर, रस्त्यांवरील धुरळा, शेतात व इतरत्र जाळला जाणारा कचरा यामुळे हवेचे अशा प्रकारचे हानीकारक प्रदूषण सर्वाधिक होते. हवेतील धुलीकणांमुळे आरोग्यास सर्वाधिक धोका संभवणाºया जगातील देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा लागतो, असेही हा अहवाल सांगतो.