मनीषा म्हात्रे
मुंबई : जानेवारी २०२३ ते मे २०२५ या अडीच वर्षात मुंबईतील रेल्वे मार्गावर ६२ कोटी रुपये किमतीचे २६ हजारांहून अधिक मोबाइल चोरीला गेले असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. लोहमार्ग पोलिसांच्या (जीआरपी) आकडेवारीनुसार, मोबाइल चोरीच्या सुमारे ४५ टक्के प्रकरणांचा (११ हजार ८५३) तपास करण्यात यश आले आहे. त्यात २० कोटी रुपयांचे मोबाइल जप्त केले आहेत. 'जीआरपी'चे नवे आयुक्त राकेश कलासागर यांनी पदभार स्वीकारल्यापासून तपासात गती आली आहे. गेल्या महिन्यातच त्यांनी ५०० मोबाइल जप्त करून संबंधित मालकांना परत दिले.
चोरांमध्ये उच्च शिक्षितांचीही सहभाग
मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये केवळ व्यसनाधीन व्यक्तीच नाहीत, तर आरोग्यशास्त्राचा माजी विद्यार्थी तुफैल मेमन याच्यासारखे सुशिक्षितही आहेत.
ऑनलाइन गेमिंगमुळे तो गुन्हेगारीकडे वळाला होता. त्याच्याकडे चोरलेले २१ फोन सापडले आहेत.
आंतरराज्यीय टोळ्यांचा छडा
रेल्वेतील चोरीप्रकरणी 'जीआरपी'ने आंतरराज्यीय टोळीच्या सदस्याला अटक केली आहे. या टोळ्या वाराणसीतील गंगा आरती, ओडिशातील जगन्नाथ यात्रा यांसारख्या गर्दीच्या ठिकाणीही सक्रिय असल्याचे उघडकीस आले. मोबाइल खरेदी करताना नेहमी सीलबंद बॉक्स आणि पावतीची मागणी करावी. विशेषतः कमी उत्पन्न गटातील नागरिकांनी सहज उपलब्ध असलेले स्वस्त फोन न खरेदी करता, अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
देशभरात होते विक्री
अनेकदा चोरलेले मोबाइल नूतनीकरण करून झारखंड, बिहार, राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये विकले जातात. अशा फोनचा माग काढून 'जीआरपी' पथक देशभरात फिरून मोबाइल परत मिळवत आहे. चोरीचे फोन खरेदी करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे.
मोबाइल चोरीमध्ये घट
'जीआरपी'च्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये १२ हजार १५९ मोबाइल चोरीचे प्रकार घडले होते. २०२४ मध्ये यात १० टक्के घट होऊन १० हजार ९८१ प्रकार नोंदवले गेले.