Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या दौऱ्यांनी शासकीय यंत्रणा कामाला लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:06 IST

मुंबई : नेत्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण येऊ नये, इतकाच शरद पवार यांच्या आवाहनाचा अर्थ आहे. मी विरोधी पक्ष ...

मुंबई : नेत्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण येऊ नये, इतकाच शरद पवार यांच्या आवाहनाचा अर्थ आहे. मी विरोधी पक्ष नेता आहे. आम्ही दौऱ्यावर जातो तेव्हा शासकीय यंत्रणा तिथे नसतेच, कारण सरकारनेच तसा शासन निर्णय (जीआर) काढला होता. पण, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून जो काही दौरा आहे तो मी येत्या तीन दिवसांत करणारच आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेत्यांनी प्रसंगावधान राखत पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असे आवाहन केले होते. नैसर्गिक आपत्तीत मदतकार्य होणे महत्त्वाचे असते. दौऱ्यांमुळे यंत्रणा फिरवावी लागते, ते योग्य नाही, असे पवार म्हणाले होते. याबाबत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे दौरे झाले तर शासकीय यंत्रणा जागी होते आणि कामाला लागते. शिवाय, लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपुढे मांडता येतो. त्यामुळे पवार यांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये.

दरम्यान, भाजपकडून राज्यातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे नऊ ट्रक रवाना करण्यात आले. पूरग्रस्तांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, कपडे, बिस्किटेचे बॉक्स, ब्लँकेट्स, चटई, सॅनिटरी नॅपकिन्ससुद्धा अशा साहित्यांची मदत आज पाठविण्यात आली. मुंबई भाजप आणि युवा मोर्चाने वेळ न घालवता पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक साहित्य जमा केले आहे. आवश्यकतेनुसार रोज मदतीचे ट्रक पूरग्रस्त भागात पाठविणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

राज्यपालांचा दौरा राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार - फडणवीस

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सूचनेनुसार राज्यपाल पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. घटनेनुसार राज्यपाल राज्याचे प्रशासकीय प्रमुख असल्याने त्यांच्या दौऱ्यावर कुणाला आक्षेप घेण्याचा अधिकारच नाही. शिवाय, या दौऱ्यात राज्यातील चारही प्रमुख पक्षांचा प्रत्येकी एक आमदार किंवा खासदाराला बोलावण्यात आले होते. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेते राज्यपालांसोबत आले नाहीत. ते का आले नाहीत मला माहिती नाही. मात्र, आमचे आशिष शेलार राज्यपालांसोबत गेले हे योग्य आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.