Join us

आमची कारवाई योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:06 IST

फार्मा कंपनीच्या चौकशी प्रकरणात मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण; गरज पडल्यास पुन्हा चौकशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फार्मा कंपनीकड़ून मोठ्या ...

फार्मा कंपनीच्या चौकशी प्रकरणात मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण; गरज पडल्यास पुन्हा चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : फार्मा कंपनीकड़ून मोठ्या प्रमाणात रेमडेसिविरचा साठा असल्याच्या माहितीच्या आधारे ब्रुक फार्मा कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांच्याकडे केलेली चौकशी योग्य असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला. तसेच गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली.

केंद्र शासनाने रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातल्याने फार्मा कंपन्यांना या इंजेक्शनचा साठा निर्यात करता आला नाही. अशात ब्रुक फार्मा कंपनीकडे मोठ्या प्रमाणात ६० हजार रेमडेसिविरचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. कोरोना काळात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रेमडेसिविरचा तुटवडा भासत असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा असेल तर त्याची चौकशी होणे गरजेचे होते, असे चैतन्या एस. यांनी सांगितले.

त्यानुसार शनिवारी संबंधित संचालकांंना बीकेसी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविले होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथकही पोलीस ठाण्यात हजर होते. तसेच एफडीएचे आयुक्त आणि सहआयुक्तांनाही याबाबत माहिती होती.

दरम्यान, पोलिसांनी डोकानिया यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि आमदार पराग अळवणी यांच्यासोबत बीकेसी पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी डोकानिया यांना पोलीस ठाण्यात का बोलावले? याबाबत चौकशी केली. तर दुसरीकडे राजकीय मंडळी पोलीस ठाण्यात पोहोचल्यामुळे खळबळ उडाली.

पोलीस ठाण्यातील शाब्दिक वादानंतर भाजपचे नेते आणि पोलीस अधिकारी बीकेसी येथील पोलीस उपायुक्त कार्यालयात पोहोचले. तेथेही फडणवीस यांनी पोलिसांना धारेवर धरले. यात दोघांमधील तासाभराच्या चौकशीनंतर डोकानिया यांना सोडून देण्यात आले. मात्र, या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले आणि पोलिसांवर टीकेची झोड उठली.

यावर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, संबंधित संचालकांना चौकशीसाठी बोलाविल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना चौकशीसाठी का बोलावले? अशी विचारणा केली. तसेच रेमडेसिविरचा साठा महाराष्ट्र शासनास देण्यास एफडीए आयुक्तांकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र, याबाबत एफडीएकड़ून कुठलीही माहिती बीकेसी पोलीस ठाण्यात देण्यात आली नव्हती, असे चैतन्या यांनी सांगितले.

यावेळी सदरची वस्तुस्थिती विरोधी पक्षनेत्यांना समजावून सांगण्यात आली. तसेच बेकायदेशीरपणे रेमडेसिविर होर्डिंग्स लावणाऱ्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांना देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आम्ही सद्भावनेतून ही कारवाई केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

..............................

गरज पडल्यास पुन्हा चौकशी

संबंधित संचालकांकडे चौकशी करून त्यांना जाऊ देण्यात आले. पुढे जेव्हा गरज पडेल तेव्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती चैतन्या एस. यांनी दिली आहे.

....