कल्याण : देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्थेच्या गर्तेत सापडलेला आणि सद्य:स्थितीत बंद असलेला डोंबिवलीमधील ह.भ.प़ कै़ सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील तरणतलाव तातडीने सुरू करा, अन्यथा आमच्या स्टाइलने तो खुला केला जाईल, असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी उपायुक्त संजय घरत यांची भेट घेऊन दिला़ यासाठी महापालिकेस पाच दिवसांची मुदत दिली आहे़ तरणतलावाच्या दुरवस्थेचे पडसाद ३१ जानेवारीच्या स्थायीच्या सभेत उमटले होते. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराची अनामत रककम जप्त करून तरणतलाव महापालिकेने ताब्यात घेऊन तो स्वत: चालवावा, असे आदेश तत्कालीन सभापती प्रकाश पेणकर यांनी प्रशासनाला दिले होते. यावर संबंधित मालमत्ता विभागाकडून देखभाल दुरुस्तीकामी ठेकेदार नेमण्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरूही केली. परंतु, याला प्रतिसाद न मिळाल्याने अद्याप तरणतलाव सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे सुटीच्या कालावधीतही तरणतलावाची सुविधा उपलब्ध होऊ शकलेली नाही. स्थायीचे नवनियुक्त सभापती दीपेश म्हात्रे यांनी पदभार स्वीकारताच तरणतलाव लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, ठोस कृती आजवर झालेली नाही. मनसेच्या शिष्टमंडळाने उपायुक्त घरत यांची भेट घेऊन तरणतलाव तातडीने सुरू करण्याची मागणी केली असून प्रशासनाबरोबरच सत्ताधार्यांचा उदासीन कारभार नागरिकांना सुविधांपासून दूर ठेवण्यास कारणीभूत ठरत असल्याची टीका कदम यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
अन्यथा आमच्या स्टाइलने तरणतलाव खुला करू
By admin | Updated: May 31, 2014 01:28 IST