कमलाकर कांबळे, नवी मुंबईराज ठाकरे यांनी महापालिका निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतल्याने मनसेतील इच्छुकांचा पुरता हिरमोड झाला आहे. त्यामुळे त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा, यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून दबाव आणला जात आहे. इतकेच नव्हे, तर पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी काहींनी चालविली आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला स्थानिक पातळीवर म्हणावा तसा करिष्मा दाखविता आला नाही. शिवाय या निवडणुकीनंतर पक्षातील गटबाजी उफाळून आली. अनेक आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकून अन्य पक्षांत प्रवेश केला. स्थानिक कार्यकारिणीविषयी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर मनसे नवी मुंबईसह औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका लढणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. असे असतानाही पक्षातील जवळपास चाळीस ते पन्नास इच्छुकांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी निवडणूक न लढण्याचा निर्णय पक्षाने जाहीर केल्याने त्यांची पुरती निराशा झाली आहे. उमेदवारी मिळेल या आशेने अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली होती. विविध कार्यक्रमांचा धडाका लावला होता. हा सर्व खर्च वाया जाणार या भीतीने अनेकांनी पर्यायाचा शोध सुरू केला आहे. काहींनी भाजपा आणि शिवसेनेबरोबर बोलणी सुरू केली आहे, तर काहींनी राष्ट्रवादीकडे शब्द टाकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मनसेत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यायचा याबाबत अनेकजण संभ्रमात असल्याचे दिसून आले आहे.
...अन्यथा मनसेचे इच्छुक अपक्ष लढणार
By admin | Updated: March 30, 2015 00:28 IST