Join us  

आणखी पालिका अधिकारी पोलिसांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 6:00 AM

डी. डी. देसाई या स्ट्रक्चरल आॅडिट कंपनीच्या नीरजकुमार देसाईसह पालिका अभियंता अनिल पाटील, एस. एफ. काकुळते हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

मुंबई : सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी जबाबदार धरत अटक केलेल्या डी. डी. देसाई या स्ट्रक्चरल आॅडिट कंपनीच्या नीरजकुमार देसाईसह पालिका अभियंता अनिल पाटील, एस. एफ. काकुळते हे न्यायालयीन कोठडीत आहेत. अद्याप कुणालाही जामीन मिळालेला नाही. यापाठोपाठ आणखी काही पालिका अधिकारी पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.१४ मार्चला हा पूल कोसळून झालेल्या अपघातात सात जण ठार तर ३० जण जखमी झाले. या प्रकरणात, देसाईच्या अटकेपाठोपाठ पालिकेच्या दोन अभियंत्यावर आझाद मैदान पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत अटकेची कारवाई केली. केवळ कामाचा व्याप असल्याचे कारण पुढे करत, अधिकाऱ्यांनी पुलाच्या तपासणीकडे दुर्लक्ष केले. तिघांच्याही निष्काळजीपणामुळे सात जणांना जीव गमाविण्याची वेळ आली. देसाईकडे दिलेल्या कामांपैकी अन्य पुलांचीही तपासणी सुरू आहे. त्या प्रकरणी संबधितांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांद्वारे पोलीस अधिक तपास करत आहेत.सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहे. यापैकी देसाईने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळून लावण्यात आला.