मनोहर कुंभेजकर, मुंबईउपनगरातील ओशिवरा नदीलगतचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच असून, त्यामुळे नदीची गटारगंगा झाली आहे. नदीची रुंदीही कमी होत असून, अतिक्रमणे अशीच वाढत राहिली तरी पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.नदी अतिक्रमणांच्या विळख्यात सापडली असून, या परिसरातील उदंचन केंद्रातील सांडपाणी नदीत सोडले जात आहे. नदीलगत वसलेल्या झोपड्यांतून सोडले जाणारे सांडपाणी, विकासकांनी केलेली अनधिकृत बांधकामे, भंगावाल्यांची अरेरावी, अशाने नदीची वाट बिकट झाली आहे. पूर्वेसह पश्चिमेकडील भंगारवाले नदीचा जीव घेत आहेत. शिवाय नदीलगतच्या तिवरांची कत्तल होत असून, त्याने पर्यावरणाची हानी होत आहे. २६ जुलैच्या महापुरात जोगेश्वरी, गोरेगाव, मालाडमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्य आणि वित्तहानी झाली होती. अशीच अवस्था राहिली तरी भविष्यात पुन्हा भीषण परिस्थिती उद्भवेल, अशी भीती स्थानिकांना आहे. याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र काहीच कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ओशिवराची झाली गटारगंगा!
By admin | Updated: May 8, 2015 00:42 IST