Join us  

अमली पदार्थासह ‘वृद्धे’ला अटक, ओशिवरा पोलिसांची कारवाई : दोन किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:55 AM

अमली पदार्थ विकणा-या एका वृद्धेला रंगेहाथ पकडण्यात मुंबई पोलिसांना मंगळवारी यश आले. ही कारवाई ओशिवरा पोलिसांनी केली असून, अटक महिलेकडून गांजा हस्तगत करण्यात आला आहे. अधिक चौकशी सुरू आहे.

मुंबई : अमली पदार्थ विकणा-या एका वृद्धेला रंगेहाथ पकडण्यात मुंबई पोलिसांना मंगळवारी यश आले. ही कारवाई ओशिवरा पोलिसांनी केली असून, अटक महिलेकडून गांजा हस्तगत करण्यात आला आहे. अधिक चौकशी सुरू आहे.जसुबाई चावडा (७५), असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती जोगेश्वरी पश्चिमच्या आकसा मशिद परिसरात राहते. या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीत अमली पदार्थांची उघडपणे विक्री केली जात असल्याची ‘टीप’ ओशिवरा पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी एका पथकाची नियुक्ती केली. ज्यात महिला पोलीस कर्मचाºयाचाही समावेश होता. या पथकाने झोपडपट्टीमध्ये सापळा रचला. त्यानुसार दुपारी १२ ते २ दरम्यान पाळत ठेवल्यानंतर एक महिला पिशवीतून काही तरी विकत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी जसुबाईला विचारले आणि चौकशी केली. मात्र, ती पोलिसांना सहकार्य करत नसल्याने महिला पोलिसंकडून तिची अंगझडती घेण्यात आली. तेव्हा तिच्याकडे गांजा हा अमली पदार्थ पोलिसांना सापडला. त्यानुसार तिला अटक करून पोलीसठाण्यात आणण्यात आले.तिच्याकडून एकूण दोन किलो गांजा हस्तगत करण्यात ओशिवरा पोलिसांच्या पथकाला यश मिळाले. ती झोपडपट्टीत गांजाची विक्री करत असल्याचे तिने मान्य केले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या गांजाची किंमत जवळपास १५ हजार रुपये असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या महिलेची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, तिने हे अमली पदार्थ कुठून आणले, याची चौकशी आम्ही करत असल्याचे खानविलकर यांनी नमूद केले. गेल्यावर्षभरात अशी आठ प्रकरणे आम्ही नोंद केल्याचेही त्यांनी सांगितले.पोलिसांना मिळाली होती ‘टीप’-जोगेश्वरी पश्चिमच्या झोपडपट्टीत अमली पदार्थांची उघडपणे विक्री केली जात असल्याची ‘टीप’ ओशिवरा पोलिसांना मिळाली. त्यांनी दुपारी १२ ते २ दरम्यान पाळत ठेवल्यानंतर एक महिला पिशवीतून काही तरी विकत असल्याने पोलिसांनी तिची चौकशी केली. तिची अंगझडती घेतल्यानंतर तिच्याकडे दोन किलोचा गांजा हा अमली पदार्थ सापडला.

टॅग्स :अमली पदार्थअटकगुन्हामुंबई