Join us

महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

By admin | Updated: April 28, 2017 00:54 IST

समाजातील सफाई कामगारांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. वारंवार प्रयत्न करूनही या सफाई कामगारांच्या सेवा-सुविधांप्रती

मुंबई : समाजातील सफाई कामगारांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. वारंवार प्रयत्न करूनही या सफाई कामगारांच्या सेवा-सुविधांप्रती शासन उदासीन आहे. मात्र, आता महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. नुकतेच या कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मुंबई महानगरपालिका आणि दिव्यज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, हे आरोग्य शिबिर नुकतेच वरळीच्या नेहरू विज्ञान सेंटरमध्ये पार पडले. दोन दिवसीय या शिबिरात सुमारे ५०० महिला सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सातत्याने कचऱ्याच्या सान्निध्यात असल्यामुळे या महिलांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता टाळता येत नाही. म्हणूनच या महिलांच्या शारीरिक स्वास्थ्याचा विचार करून, या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य, योगा, आयुर्वेदाचे जेवणातील महत्त्व, त्वचारोग, मधुमेह, परिवार कल्याण आणि नियोजन, यासारख्या काही महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी या महिलांना मार्गदर्शन केले.या शिबिराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, महापालिका आयुक्त अजय मेहता आणि शेफ संजीव कपूर यांनी उपस्थिती दर्शविली. स्त्रियांनी आपल्या सबलीकरणावर आणि सक्षमीकरणावर भर देत, आपल्या स्वप्नांच्या पंखांनी उंच भरारी घेण्याचा सल्लाही या वेळी अमृता फडणवीस यांनी दिला. (प्रतिनिधी)