Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाच्या १६५व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:06 IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या १६५व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ ...

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या १६५व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघ आणि लायन्स क्लब ऑफ मिलेनियम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ४२ युनिट रक्त जमा करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह विविध प्राधिकरणाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह ४२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

मुंबई विद्यापीठाच्या कवी कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना कक्षामार्फत गेल्या वर्षभरापासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्र. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

कोविड - १९ या साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटामुळे अनेक ठिकाणी बंद करण्यात आलेली रक्तदान शिबिरे आणि रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासू लागला होता. या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई विद्यापीठाने आतापर्यंत २५१ रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून १७,४०१ युनिट रक्त जमा करण्यात आले असून, शासकीय रक्तपेढीत ते जमा करण्यात आले असल्याचे राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा. सुधीर पुराणिक यांनी सांगितले.

कोट

कोविड - १९ या साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीतही विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजवंतांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. समाजसेवेचा वसा हा असाच अविरत सुरू ठेवला जाणार आहे.

– प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ